आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले. विमान अपघात हा गुन्हा 100 टक्के दखल पात्र आहे. मग यात गुन्हा का दाखल केला जात नाही, असा सवाल यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केला. तसेच या विमान अपघाताची चौकशी सीआयडी, सीबीआयकडून करा आमचं काही म्हणंण नाही, परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी कली. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले युग्रेंद्र पवार?
सीआयडीने आदेश दिला तरच बारामती पोलीस या प्रकरणात एफआयआर दाखल करून पुढील चौकशी करतील अशी माहिती युग्रेंद्र पवार यांनी दिली आहे. सीआयडीची पत्रकार परिषद होणार आहे, ती झाल्यानंतर ते मला कळवतील, सीआयडी यामध्ये चौकशी करत आहे, त्यामुळे एफआयआर दाखल करता येत नाही असं त्यांनी मला सांगितलं आहे. सीआयडीने आदेश दिला तरच बारामती पोलिस एफआयआर दाखल करून चौकशीला सुरुवात करतील. सीआयडीने आदेश दिल्यावर आम्ही इथे येऊन एफआयआर दाखल करू, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल सुरुवातीपासूनच काही जणांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी देखील या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. रोहित पवार यांच्यासोबतच अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती. या प्रकरणात एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी रोहित पवार यांची मागणी आहे.