पुणे - बारामती येथील विमान अपघाताच्या घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणात काही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. विमान अपघात तपास ब्युरो या (एएआयबी) यंत्रणेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्ष हा तपासात महत्त्वाचा घटक राहणार आहे. त्याआधारे पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. याबाबत रामानंद म्हणाले, "अपघातामध्ये कोणता घातपात आहे का, गुन्हेगारी कृत्य घडले आहे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स आहे का? या दृष्टीने सीआयडीमार्फत तपास करण्यात येत आहे.
या घटनेचा तपास योग्य पद्धतीने करण्यात येत आहे. बारामती वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक सायन्स लॅब, एविएशन ऑथॉरिटी आणि केंद्रातील तपास यंत्रणा या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करीत आहेत. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो (एएआयबी) आणि सीआयडी यांच्यामध्ये समन्वय ठेवून तपास करण्यात आहे. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरोचा निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे सीआयडी पुढील तपास करणार आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांच्याकडे सोपविण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. सीआयडीने या प्रकरणात बरेच पुरावे एकत्रित केले आहेत. आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे रामानंद यांनी सांगितले.
मात्र, बारामती येथील विमान अपघाताच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे का, ब्लॅक बॉक्स जळाला आहे का? यासह अन्य प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून गतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, सीआयडी पुणे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, सीआयडी मुंबई कोकण विभागाचे पोलिस अधीक्षक प्रशांत वागुंडे उपस्थित होते.