...तर माझं नाव कुणालाच कळलं नसतं, धनंजय मुंडेंनी सांगितली अजितदादांची 'ती' आठवण 
निलेश बुधावले, एबीपी माझा February 26, 2026 10:13 PM

Dhananjay Munde :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल फटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींन उजाळा दिला. 2014 ला अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबादारी टाकली होती. यावेळची आठवण मुंडे यांनी यावेळी सांगितली. 

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

माझा प्रदीर्घ सहवास नसला तरी 15 वर्ष मी अजितदादा यांच्यासोबत होतो. 2014 साली मला त्यांनी विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. ज्यावेळी आपण विरोधात होतो, अनेक मान्यवर त्यावेळी होते. जबाबदारी सांभाळणारे अनेक दिग्गज होते. परंतू, तरीदेखील मला संधी देण्यात आली. ती मिळाली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. 2014  ते 2019 पाच वेळा यात्रा निघाल्या. हे फक्त त्याच काळात झालं. 2019 मधे संख्या वाढली. आज दादा आपल्या सोबत नाहीत. आज वहिनी तुमच्यात आम्ही दादांना पाहत आहोत असे मुंडे म्हणाले.

सुनेत्रा पवार यांची एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने नुकसान झाल्याचे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. अजित पवार यांच्यामुळं राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती, सामान्य कुटुंबातून ते आले होते. 2023 मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले, हे सांगण्यात मला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्याच सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.  अजित दादा 28 जानेवारी दिवशी आपल्यातून निघून गेले, आपल्या सर्वांसाठी ते धक्कादायक होतं. आपल्या सर्वाना प्रश्न होता उद्या आपण काय करणार, कसं करणार? पण सुनेत्राताईंच्या नेतृत्वात आपला पक्ष काम करेल, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 

मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, प्रफुल पटेल यांची घोषणा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.