डोंबिवली स्थानक परिसर फेरीवालामुक्त करा
नगरसेविकेचे प्रशासनाला निवेदनाद्वारे साकडे
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाढती गर्दी, वाहतुकीची कोंडी आणि पादचाऱ्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, हा परिसर तातडीने ‘फेरीवालामुक्त’ करण्याची मागणी भाजप नगरसेविका रंजना पेणकर यांनी केली आहे. यासंदर्भात रंजना पेणकर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षली चौधरी आणि उपमहापौर राहुल दामले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
स्थानक परिसरात फेरीवाल्यांमुळे चालण्यासाठी जागा उरलेली नाही. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा हवाला देत पेणकर यांनी फेरीवाल्यांमुळे स्थानक परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना गर्दीतून वाट काढणे कठीण झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. अनधिकृत बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाल्याचेही म्हटले आहे.
प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
नगरसेविका रंजना पेणकर आणि मितेश पेणकर यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे, की नागरिकांना सुरक्षित आणि निर्बाध पादचारी मार्ग उपलब्ध करून देणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जर अनधिकृत फेरीवाल्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही, तर जनहितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडले जाईल.