पाणीपट्टी वसुलीला 'कोरड'
esakal February 27, 2026 03:45 AM

पाणीपट्टी वसुलीला ‘कोरड’
ठाणे पालिकेची ६४ टक्के ‘घागर’ रिकामी; निवडणुकांचा फटका, २५० पैकी ८९ कोटी जमा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांविरुद्ध नळजोडणी खंडित करणे आणि पंपहाउस सील करण्यासारखा कारवाईचा बडगा उगारला असला, तरी पाणीपट्टी वसुलीला ‘कोरड’ लागल्याचे समोर आले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी दिलेले २५० कोटींचे उद्दिष्ट गाठताना पालिका प्रशासनाचा घाम निघत असून, आतापर्यंत तिजोरीत ८९ कोटी जमा झाले आहेत. मध्यंतरी झालेल्या पालिका निवडणुकांमुळे वसुलीला दोन महिने ब्रेक लागल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे ३५.८३ टक्के वसुली झाली असून, उर्वरित ६४ टक्के पाणीपट्टी वसूल करण्यासाठी प्रशासनासमोर अवघ्या महिनाभराचे आव्हान उरले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. एकीकडे वाढते नागरीकरण आणि पाण्याची मागणी यामध्ये ताळमेळ साधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, पण या प्रयत्नांना थकबाकीदारांचा अडथळा येत असल्याचे समोर आले आहे. मालमत्ता कर भरण्यात ठाणेकर आग्रही असताना पाणीपट्टी भरण्यासाठी कमालीची उदासीनता दिसून आली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी बुडत असून, त्याचा फटका ठाणे महापालिकेला बसत आहे. वास्तविक ठाणे पालिका स्वतःच्या योजनेसह मुंबई महापालिका, एमआयडीसीकडून पाणी घेते. प्रक्रिया करून हे पाणी ठाणेकरांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. हा खर्च पाणीपट्टीच्या रुपाने भरून काढला जातो, पण आता खर्च निघत नसल्याने पालिकेवरील बोजा वाढत चालला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, एकूण २५० कोटी आठ लाख ८० हजार रुपयांच्या उद्दिष्टापैकी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पालिकेच्या तिजोरीत केवळ ८९ कोटी ६० लाख सात हजार रुपये जमा झाले आहेत. यंदा वसुलीत झालेली ही मोठी घसरण प्रशासनाच्या चिंतेत भर घालणारी आहे. दरम्यान, यंदा ठाणे महापालिका निवडणुकांमुळे कर्मचारी आणि यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त होती. या दोन महिन्यांच्या कालावधीत वसुलीची मोहीम थंडावली, ज्याचा थेट परिणाम एकूण वसुलीवर झाला असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

विभाजनाचा फटका, नियोजनाचा अभाव
पाच वर्षांपूर्वीपर्यंत पाणीपट्टीची वसुली ही मालमत्ता करासोबतच केली जात होती. त्या वेळी वसुलीचे प्रमाण समाधानकारक आणि नियमित होते. मात्र, त्यानंतर पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी स्वतंत्रपणे पाणीपुरवठा विभागाकडे सोपवण्यात आली. तेव्हापासूनच पाणीपट्टी बुडवण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मालमत्ता कर विभाग ज्या कार्यक्षमतेने वसुली करतो, तशी कामगिरी पाणीपुरवठा विभागाकडून होताना दिसत नसल्याने प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दिवा, वागळे विभागाची कामगिरी निराशाजनक
विभागीय आकडेवारीनुसार, दिवा प्रभाग समितीची अवस्था सर्वाधिक बिकट आहे. येथे केवळ १७.४० टक्के वसुली झाली आहे. त्याखालोखाल वागळे २१.२१टक्के आणि मुंब्रा ३१.९१ टक्के विभागांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, वर्तकनगर विभागाने ५१.४८ टक्के वसुली करून इतर विभागांच्या तुलनेत समाधानकारक कामगिरी केली आहे.

कारवाईचा बडगा फोल
पाणीपट्टी वसुलीसाठी ठाणे महापालिकेने अभय योजना जानेवारीमध्ये लागू केली आहे. चालू वर्षाच्या मागणीसह थकबाकी भरल्यास दंड, व्याजात शंभर टक्के सूट देण्यात आली आहे, पण महिनाभरानंतरही या योजेनेमुळे फारशी वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे पाणीपट्टी बुडवणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नळसंयोजन खंडित करणे, मीटर रूम सील करणे, पंप जप्ती अशी कारवाई रोज सुरू आहे.


प्रभाग समिती उद्दिष्ट (कोटीत) वसुली (कोटीत) वसुली टक्केवारी
वर्तकनगर २०.३९ १०.४९ ५१.४८
लोकमान्य-सावरकर नगर १५.४६ ७.३४ ४७.५०
माजीवडा-मानपाडा ४०.४७ १९.१३ ४७.२९
नौपाडा-कोपरी ३५.०७ १४.२७ ४०.७१
कळवा २४.८७ ९.४८ ३८.१४
दिवा ४६.२४ ८.०४ १७.४०

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.