ठाण्याच्या कोपरीतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
esakal February 27, 2026 04:45 AM

ठाण्याच्या कोपरीतील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
आठ ते नऊ तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : कोपरी परिसरातील कन्हैय्या नगर येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राजवळ असलेल्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये बुधवारी (ता. २६) पहाटे भीषण आग लागल्याची घटना समोर आली. त्या आगीने काही वेळेत भीषण रुपधारण केले होते. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. या आगीवर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्तरित्या अंदाजे आठ ते नऊ तासांनी संपूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोपरी पूर्व येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच कोपरी अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले होते. तातडीने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, जवानांनी समन्वयाने केलेल्या प्रयत्नांमुळे त्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात एक वाजण्याच्या सुमारास यश आले. डम्पिंग ग्राउंडमधील कचरा व सुक्या झाडांच्या अवशेषांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून आग लागण्याचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.