तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर दिवाळे कोळीवाडा येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक दोनमधील विद्यार्थ्यांनी आर्थिक दुर्बल घटक स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेतील आठवीतील साईराम अय्यपन पिल्ले, अमित रमेश घनघाव आणि अजिंक्य सिद्धार्थ यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास आणि वर्गशिक्षक प्रशांत खांडगे यांचे योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे मुख्याध्यापिका सुहासिनी लोंढे यांनी सांगितले.