कास परिसरात रस्त्याची दुरवस्था
ठेकेदाराचे बांधकाम विभागाच्या नोटीसकडेही दुर्लक्ष; वाहनचालक, प्रवासी त्रस्त
कास, ता. २७ ः जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठार, तसेच बामणोलीपासून तापोळापर्यंतच्या दुर्गम भागाला जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणांशी जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग २६ म्हणजेच सातारा- तापोळा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची वार्षिक डागडुजी करण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले असून, बांधकाम विभागाने वारंवार नोटीस देऊनही त्यांना बेदखल करण्याचा प्रकार ठेकेदार करत आहे.
नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभाग मेढा यांच्या वतीने ठेकेदाराला नोटीस बजावली असून, त्यात म्हटले आहे, की सातारा- यवतेश्वर- पेट्री- घाटाई देवी फाटा- घाटाई देवी मंदिर- कास- बामणोली- गोगवे- तापोळा- महाबळेश्वर या रस्त्याच्या वार्षिक देखभाल दुरुस्ती काम आपण घेतले आहे. वरील कामास अनुसरून संदर्भीय पत्रान्वये निविदा मंजूर झाली आहे. या कामाची सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या रस्त्यावर सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत, तसेच साइडपट्ट्यांवर अनेक झाडांच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे वळणावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. खड्डे भरण्याचे, तसेच साइडपट्ट्यांवर आलेले गवत व झाडांच्या फांद्या काढणे आदी कामे करणे गरजेचे असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ११ फेब्रुवारीला कनिष्ठ अभियंता एम. एम. कोन्हाळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र, अद्याप कोणतेही काम करण्यास सुरुवात झाली नसल्याने कामे तत्काळ सुरू करावीत, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.
-----------------------------
कोट
या रस्त्याची व इतर कामासंदर्भात निविदा मंजूर होऊनही ठेकेदार काम करत नसल्याने या मार्गावरील प्रवासी, पर्यटक यांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. ठेकेदाराने तत्काळ काम न केल्यास निविदा रद्द करून दुसऱ्या ठेकेदाराची नेमणूक करावी.
- तानाजी किर्दत, छत्रपती संघटना.
-------------------------
04642, 04643
कास : येथील परिसरात रस्त्याची झालेली दुरवस्था.
-------------------------