मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी अभय योजना
esakal February 28, 2026 08:45 AM

पिंपरी, ता. २७ ः मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने एक ते ३१ मार्च या कालावधीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कराच्या विलंब शुल्कावर (दंड) ९० टक्के सवलत मिळणार आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकीत मिळकतकर वसुली सुरू आहे. या मोहिमेला गती देऊन थकीत कर वसूल होण्यासाठी ‘विशेष अभय योजना’ सुरू करण्यात येत आहे. याअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व मोकळ्या जागांची थकबाकी एकरकमी भरल्यास महापालिकेने कर विलंब दंडावर ९० टक्के सवलत जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२०२६ च्या मिळकतकरासह थकबाकीची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणाऱ्यांनाच सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

करभरणा सर्वांचे कर्तव्य
शहराच्या विकासासाठी मालमत्ताकर हा महत्त्वाचा महसूल स्रोत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा नागरिकांच्या मालमत्ता करातूनच उभ्या राहत आहेत. वेळेत कर भरणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्यभावना आहे. नागरिकांच्या करातूनच शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सेवा व इतर विकासकामे उभी राहत असतात. त्यामुळे थकबाकीदारांनी विलंब न करता त्वरित संपूर्ण रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

वस्तुस्थिती....
- आतापर्यंत शहरातील पाच लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी सुमारे ७४७ कोटी रुपयांचा कर भरला आहे
- मिळकतकर वसुली मोहिमेला अधिक गती देण्यासाठी १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत
- थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात असून, कर भरण्याचे आवाहन विविध माध्यमातून केले जात आहे
- सुमारे दोन लाख १२ हजार ४४० थकबाकीदारांनी अद्यापही थकीत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही

मिळकतींच्या वापरनिहाय तपशील (कोटी रुपयांत)
मिळकती / संख्या / थकबाकी / चालू येणे / एकूण येणे
निवासी / १,८२,०२७ / ४०४.७५ / ९१.२७ / ४९६.०२
बिगरनिवासी / १८,२८४ / ३४१.५८ / ४१.६९ / ३८३.२७
मिश्र / ५,२३३ / ९३.७३ / ९.३९ / १०३.१२
औद्योगिक / १,३४१ / १८.०२ / ३.१३ / २१.१५
मोकळी जमीन / ५,३०८ / ३७४.४१ / १६.४८ / ३९०.८९
इतर / २४७ / ०.४० / ०.०२ / ०.४२
एकूण / २,१२,४४० / १२३२.८९ / १६१.९८ / १३९४.८७

मिळकतकर शास्ती (दंड) रक्कम (कोटी रुपयांत)
मिळकती / थकबाकी / चालू येणे / एकूण येणे
निवासी / १२५.२२ / २.४७ / १२७.६६
बिगरनिवासी / ९३.६४ / ०.७२ / ९४.३६
मिश्र / ३०.१६ / ०.३६ / ३०.५३
औद्योगिक / ३.२५ / ०.०७ / ३.३३
मोकळी जमीन / १९९.७८ / ०.२२ / २००.०१
इतर / ०.१४ / ०.०० / ०.१४
एकूण / ४५२.१९ / ३.८४ / ४५६.०३

नागरिकांना महापालिकेकडून सुविधा अपेक्षित असतात. त्याप्रमाणे प्रत्येकाने मिळकतकर भरणेही आवश्यक आहे. आता थकबाकी वसुलीसाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. यामुळे थकबाकीदारांवरील आर्थिक ताण कमी होऊन दिलासा मिळणार आहे. शहराच्या विकासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याने त्यांनी ३१ मार्चपूर्वी थकीत कर भरावा. त्यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
- रवी लांडगे, महापौर

मिळकतधारकांनी मिळकतकराची थकीत रक्कम एक ते ३१ मार्च या कालावधीत एकरकमी भरायची आहे. त्यामुळे महापालिका शास्तीवर ९० टक्के सवलत लागू होईल. ही योजना सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी लागू आहे. थकबाकीदारांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित भरणा करावा. मुदत संपल्यानंतर नियमित वसुली प्रक्रिया सुरू राहील.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.