पुणे - इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमधील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दुबईमध्ये गेलेले अनेक भारतीय नागरिक, विद्यार्थी अडकले असून ते परतीच्या प्रतीक्षेत आहेत. पुण्यातील ८० विद्यार्थी देखील दुबईत अडकले असून हवाई वाहतूक सुरळीत झाल्यानंतर या विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांचा परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
मध्य पूर्वेत इस्राईल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम हवाई सेवांवर झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आखाती देशांमधील काही हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. परिणामी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे दुबईमध्ये पर्यटन, नोकरी, व्यवसाय अथवा कौटुंबिक कारणासाठी गेलेले भारतीय नागरिक तेथे अडकले आहेत.
परतीची तिकिटे निश्चित असतानाही अचानक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना विमानतळावर किंवा हॉटेलमध्ये अतिरिक्त मुक्काम करावा लागत आहे. पुढील प्रवासाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आली नसली तरी दुबईतील भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांशी संपर्क साधला जात आहे.
‘इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या अध्यक्ष डॉ. तरिता शंकर म्हणाल्या, ‘संस्थेच्या स्कूल ऑफ बिझनेसचे विद्यार्थी गेल्या पंधरा वर्षांपासून दरवर्षी दुबईमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी जातात. त्याप्रमाणे यंदाही एमबीए अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचे ८० विद्यार्थी या दौऱ्यासाठी गेले.
अभ्यास दौरा संपून या विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास शनिवारी आणि रविवारी रात्री सुरू होणार होता. परंतु, तेथील हवाई वाहतूक बंद केल्याने हे विद्यार्थी दुबईत आहेत. दरम्यान, सर्व विद्यार्थी दुबईच्या मध्य भागात असून सुरक्षित आहेत.
विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी दुबईतील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्याही संपर्कात आहोत. हवाई वाहतूक खुली झाल्यानंतर हे विद्यार्थी भारतात परततील. अन्यथा भारतीय दूतावासाशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आणण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.’’
अभ्यास दौऱ्यासाठी गेले आहेत विद्यार्थी
पुण्यातील ताथवडे येथील इंदिरा इन्स्टिट्यूटच्या स्कूल ऑफ बिझनेसच्या ८० विद्यार्थ्यांचा गट दुबईमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेला आहे. हे विद्यार्थी शनिवारी आणि रविवारी रात्री ४०-४० अशा टप्प्या-टप्प्याने भारतात परतणार होते. परंतु, दुबईमधील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याने हे विद्यार्थी दुबईत अडकले आहेत.