पुणे - गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. शनिवारी (ता. २८) देखील किमान तापमानामध्ये घट झाली. परिणामी शहरात थंडी परतली असून पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहर आणि परिसरात गेल्या पाच दिवसांत तापमानात सहा अंश सेल्सिअसची घट झाली आहे. शनिवारी (ता. २८) किमान तापमानात घट होऊन १३.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे पहाटे आणि सायंकाळी थंडी वाढली आहे.
कमाल तापमान स्थिर आणि आकाश निरभ्र असल्याने दुपारी उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत किमान आणि कमाल तापमानामध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. १) कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर १४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
सोमवारपासून (ता. २) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.