T20 World Cup 2026: टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने केलं संजू सॅमसनचं कौतुक, म्हणाला…
Tv9 Marathi March 01, 2026 08:45 AM

भारताने सुपर 8 फेरीत झिम्बाब्वेला 72 धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. आता भारतासमोर वेस्ट इंडिजचं आव्हान आहे. वेस्ट इंडिजच्या संघाचं तसं काही सांगता येत नाही. एकदा चालले तर सामना पूर्णपणे खेचून घेतात. नाही तर सामन्यात कुठेच नसतात. त्यामुळे या सामन्यात काय होईल सांगता येत नाही. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा या स्पर्धेतील फॉर्म तसा चांगला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता वेस्ट इंडिजने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला कमी लेखणं चुकीचं ठरेल. या सामन्यासाठी टीम इंडियानेही कंबर कसली आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात मिळवलेल्या यशानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने संघाचं कौतुक केलं. यावेळी त्याने संजू सॅमसनच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसमोर गौतम गंभीरने त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

काय म्हणाला गौतम गंभीर?

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने दिलेली सुरुवात भारतीय संघासाठी महत्त्वाची होती, असे प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला. खरं तर ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर संजू सॅमसनचं प्लेइंग 11 मधील स्थान डळमळीत झालं होतं. अभिषेक शर्मा आजारी होता. त्यावेळेस नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण त्यानंतर त्याला पुन्हा डावलण्यात आलं. पण सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा दारूण पराभव झाल्यानंतर संजू सॅमसनला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली. त्याने संघाला चांगली सुरूवात करून दिली. फार धावा करण्यात यश आलं नाही. त्याने 15 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकार मारत 24 धावा केल्या.

संजूने दिलेल्या चांगल्या सुरुवातीमुळे इतर फलंदाजांसाठी गोष्टी सोप्या झाल्या. या विश्वचषकात भारताने मैदानात उतरवलेली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन होती. त्यामुळे फलंदाजी क्रमात डाव्या-उजव्या फलंदाजांचा समतोल राखण्यासही मदत झाली.दुसरीकडे, संजू सॅमसनने या स्पर्धतील काही अनुभव शेअर केले. आयपीएलमध्ये खेळल्यानंतर चेन्नईला येण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे, असे संजू सॅमसनने सांगितले. विमानतळावर पोहोचल्यापासून त्याला विशेष प्रेम मिळाले. केरळमध्ये जे मिळते तेच ते होते. ती ऊर्जा अनुभवू शकतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.