इस्राईल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामनेई यांचा मृत्यू झाल्याने हे युद्ध आणखी पेटणार असं दिसत आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. युद्धाचा थेट परिणाम विमानसेवेवर झाला आहे. त्यामुळे अनेक विदेशी नागरिक विमानतळावरच अडकले आहेत. त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. या युद्धाचा परिणाम क्रीडाक्षेत्रावरही दिसून आला आहे. आबुधाबीत होणार इंग्लंड लायन्स आणि पाकिस्तान शाहीन यांच्यातील वनडे सामना रद्द झाला आहे. इतकंच काय तर भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही याचे परिणाम दिसून येत आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने एक निवेदन जाहीर केलं. तसेच या तणावपूर्ण स्थितीत दुसरा मार्ग काढण्यासाठी एक योजना आखण्यास सुरूवात केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने स्पष्ट केलं की, आखाती देशातील स्थितीचा स्पर्धेवर तसा काही थेट परिणाम होताना दिसत नाही. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. ही 7 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. 8 मार्चला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. आता अंतिम टप्प्याचे सामने सुरू आहेत. सुपर 8 फेरीचे सामने रविवारी संपतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरी पकडून 3 सामने शिल्लक राहतील. श्रीलंका आणि पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून आऊट झाल्याने उर्वरित तिन्ही सामने भारतात होणार आहे. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल.
आयसीसीने प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट सांगितलं की, ‘आयसीसी ट्रॅव्हल अँड लॉजिस्टिक्स टीम आंतरराष्ट्रीय एअरलाईन्ससोबत सक्रियपणे चर्चा करत आहे. युरोप, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया केंद्रांच्या माध्यामातून पर्यायी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करत आहे.’ त्यामुळे विदेशी खेळाडूंना मायदेशी परतण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आयसीसीने पुढे स्पष्ट केलं की, ‘आयसीसीचे सुरक्षा सल्लागार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत आणि परिस्थिती बदलत असताना सल्ला देतील. एक समर्पित आयसीसी ट्रॅव्हल सपोर्ट डेस्क देखील सक्रिय करण्यात आला आहे.’