Israel Iran Conflict : इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते आणि धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूच्या बातमीने उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर गावात शोककळा पसरली. खामेनींचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हिंदी यांचे मूळ या गावाशी संबंधित असल्याची माहिती आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना या घटनेचे पडसाद भारतातही उमटले आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर हे छोटेसे गाव शोकाकुल झाले आहे.
बाराबंकीच्या सिरौली गौसपूर तहसीलमधील किंतूर गावाचा खामेनी कुटुंबाशी ऐतिहासिक संबंध असल्याचं सांगितलं जातं. अयातुल्ला खामेनी यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हिंदी हे 18व्या-19व्या शतकात याच गावात राहत होते, अशी माहिती स्थानिकांकडून दिली जाते.
स्थानिक वयोवृद्धांच्या मते, सय्यद अहमद मुसावी हिंदी यांनी आपल्या नावामागे ‘हिंदी’ हा शब्द जोडून मूळ भारतीय ओळख जपली होती. या गावात आजही काही जुनी कागदपत्रे आणि परंपरागत वास्तूंच्या आठवणी या ऐतिहासिक नात्याची साक्ष देतात, असं सांगितलं जातं.
सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवरून हल्ल्याची आणि मृत्यूची बातमी गावात पोहोचताच नागरिकांनी घरात बसून घडामोडींचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावात एक प्रकारचे स्तब्ध वातावरण पसरले.
स्थानिक रहिवासी सय्यद निहाल मिया यांनी भावुक होत ही घटना केवळ इराणची नाही तर संपूर्ण जगाची हानी असल्याचे म्हटलं. डॉ. रेहान काजमी यांनीही ही मोठी दुःखद घटना असल्याची भावना व्यक्त केली. अनेक ग्रामस्थांनी या घटनेला 'इतिहासातील वेदनादायक क्षण' असं संबोधलं.
गावातील नागरिक एकत्र येऊन जुन्या आठवणी आणि या ऐतिहासिक नात्याविषयी चर्चा करत असल्याचं चित्र आहे. हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद या छोट्या गावातही स्पष्टपणे उमटत आहेत.
किंतूरसारख्या छोट्या गावाचे नाव जागतिक पातळीवर चर्चेत आले असले तरी ग्रामस्थांमध्ये दुःख आणि अस्वस्थतेची भावना अधिक आहे. ऐतिहासिक संबंधाचा अभिमान असला तरी अशा दु:खद प्रसंगाने गावकऱ्यांना अंतर्बाह्य हादरवल्याचं चित्र आहे.
इराण-इस्रायल संघर्षामुळे पश्चिम आशियात अस्थिरता वाढली आहे. विविध देशांकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, या घटनेचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या भागाकडे लागले आहे.
ही बातमी वाचा :