आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या आणि अतिशय निर्णायक अशा सामन्यात टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. हा सामना जिंकणारा संघ सेमी फायनलमध्ये पोहचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असाच आहे. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्य बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिल्डिंगचा निर्णय घेत वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता टीम इंडियाचे गोलंदाज विंडीजच्या राक्षसी फलंदाजीसमोर कशी बॉलिंग करतात? याकडेच पहिल्याच डावात साऱ्या भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने विंडीज विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडिया झिंबाब्वे विरूद्धच्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरली आहे. टीम इंडियाचा फिनिशर रिंकू सिंह त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करुन काही तासांतच परतला. त्यामुळे रिंकूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र टीम मॅनेजमेंटने 11 खेळाडूंमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच विंडीजने एकमेव बदल केला आहे. या बदलामुळे विंडीजची ओपनिंग जोडी बदलली आहे. ओपनर ब्रँडन किंग याच्या जागी अकील होसेन याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता विंडीजसाठी शाई होप आणि रोस्टन चेज ही सलामी जोडी ओपनिंग करणार आहेत.
टीम इंडिया हा सामना जिंकणार का? हा प्रश्न उपस्थित करण्यामागे इडन गार्डन्समधील आकडेवारी आहे. या टी 20i वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 5 पैकी 4 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर फक्त एकदाच विजयी धावांचा पाठलाग करणारी टीम जिंकली आहे. त्यामुळे भारत-विंडीज सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन : शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती आणि शामर जोसेफ.