27925
डॉ. वज्राटकरांची रुग्णसेवा आदर्शवत
ॲड. निरवडेकर ः निवृत्तीनंतरही सावंतवाडीतच सेवा द्यावी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः ‘‘शासकीय नियमानुसार डॉ. पांडुरंग वज्राटकर निवृत्त होत असले, तरी त्यांनी केलेली रुग्णसेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ पुढील दोन वर्षे सावंतवाडीकरांनाच मिळावा, यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहतील,’’ असे प्रतिपादन प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले.
येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वज्राटकर यांचा निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ काल (ता. २८) आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, मोहिनी वज्राटकर, डॉ. अनिकेत वज्राटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कर्तरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, प्रफुल्ल वालावलकर, राजू मसूरकर, भास्कर केरवडेकर, डॉ. शंतनु तेंडुलकर, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. गिरीशकुमार चौगुले, डॉ. अभिजित चितारी आदी उपस्थित होते.
ॲड. निरवडेकर म्हणाले, ‘‘रुग्णांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉ. वज्राटकर यांनीही रुग्णसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे. संवादकौशल्य कसे असावे, याचे उत्तम उदाहरण डॉक्टरांनी आपल्या सेवेतून घालून दिले आहे.’’
रवी जाधव यांनी उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियनची मोठी आवश्यकता असल्याचे सांगितले. डॉ. वज्राटकर यांनी निवृत्तीनंतरही आधुनिक उपचारपद्धती स्वीकारून आपली सेवा सुरू ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. अमोल पावसकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत डॉ. वज्राटकर यांच्या रुग्णांशी संवाद साधण्याच्या खास शैलीचे कौतुक केले. विविध मान्यवरांनी डॉ. वज्राटकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. सोन्सूरकर यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्याला रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.