T20 World Cup 2026 : सिकंदर रझाचा जाता जाता धमाका, सूर्यकुमारला झटका, झिंबाब्वेच्या कॅप्टनने काय केलं?
Tv9 Marathi March 02, 2026 03:45 AM

कायम लिंबुटिंबु म्हणून गृहीत धरण्यात आलेल्या झिंबाब्वे क्रिकेट टीमने यंदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात (Icc T20i World Cup 2026) जबरदस्त कामगिरी केली. झिंबाब्वेने पात्रता फेरीतून 10 व्या पर्वाचं तिकीट मिळवलं. तसेच साखळी फेरीत अजिंक्य राहत 4 पैकी 3 सामने जिंकून सुपर 8 फेरीत धडक दिली. झिंबाब्वेने साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या वर्ल्ड कप विजेत्या संघांना पराभूत करत उलटफेर केला. झिंबाब्वेने यासह क्रिकेट चाहत्यांनी मनं जिंकली.

झिंबाब्वेकडून चाहत्यांना साखळी प्रमाणे सुपर 8 फेरीतही जबरदस्त कामगिरीची अपेक्षा होती. मात्र झिंबाब्वेला पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे झिंबाब्वेचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे झिंबाब्वे जाता जाता सुपर 8 फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उलटफेर करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र झिंबाब्वे आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली.

दक्षिण आफ्रिकेची सुपर 8 मध्ये विजयी हॅट्रिक

दक्षिण आफ्रिकेने हा सामना 5 विकेट्सने जिंकत या 10 पर्वात अजिंक्य राहण्याची मालिका कायम ठेवली. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी मिळालेलं 154 धावांचं आव्हान 5 विकेट्स गमावून 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. सामना जरी दक्षिण आफ्रिकेने जिंकला असला तरी झिंबाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझा हा मॅन ऑफ द मॅच ठरला. सिकंदरने या सामन्यात केलेल्या ऑलराउंड कामगिरीसाठी त्याला या पुरस्काराने सन्मानित केलं. सिकंदरने यासह टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याला फार मागे टाकलं. सिकंदरने नक्की काय केलं? जाणून घेऊयात.

सिकंदरची जबरदस्त कामगिरी

सिकंदरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 73 धावा केल्या. त्यानंतर 3 विकेट्सही मिळवल्या. सिकंदर यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील एका सामन्यात 50+ रन्स आणि 3 विकेट्स मिळवणारा एकूण सहावा खेळाडू ठरला. तसेच रजा वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात असा कारनामा करणारा एकमेव खेळाडू ठरला.

सिकंदर रझाचा धमाका

तसेच सिकंदर टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील एका सामन्यात 70 किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि 3 विकेट्स घेणारा दुसरा फलंदाज ठरलाय. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूने अशी कामगिरी करण्याची 2012 नंतरची ही पहिलीच आणि एकूण दुसरीच वेळ ठरली आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात आधी ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन याने 70 धावा आणि 3 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.वॉटसनने 2012 साली ही कामगिरी केली होती.

सिकंदरची आघाडी मजबूत, सूर्या आणखी पिछाडीवर

सिकंदर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला. सिकंदरने यासह टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा दुसरा खेळाडू म्हणून आपला रेकॉर्ड आणखी मजबूत केला. सिकंदरची टी 20i क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकण्याची ही 21 वेळ ठरली. तर सूर्या आतापर्यंत 17 वेळा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.