IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video
esakal March 02, 2026 03:45 AM

Vande Mataram celebration IND vs WI viral video: चांगल्या लोकांसोबत, चांगलंच होतं... सूर्यकुमार यादवने काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेले हे विधान आज संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) बाबतीच तंतोतंत खरे ठरले. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात संजूला पुन्हा संधी मिळाली आणि त्याने आक्रमक खेळ करून वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत आपली जागा पक्की केली. संजूला याच दिवसासाठी, याच खेळीसाठी टीम इंडियाने राखून ठेवलं होतं, असं आज जाणवलं. कारणस १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकट्या संजूने ९७ धावांची नाबाद खेळी केली. अन्य फलंदाजांना ३० हून अधिक धावाही करायला नाही जमल्या... क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या सामन्यात संजूने जेव्हा विजयी चौकार खेचला, तेव्हा इडन गार्डनवर एकच जल्लोष झाला...

स्टेडियमवर उपस्थित प्रत्येकाच्या मुखावर वंदे मातरम् होते आणि पॅव्हेलियनच्या दिशेने जाणाऱ्या संजूला कर्णधार सूर्यकुमार यादवने कुर्निसात दिला. सर्व खेळाडूंनी त्याला मिठी मारली... मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला संजूने दिलेले हायफाईव्ह अन् त्यानंतरची मिठी ही सर्वांचा आनंद व्यक्त करणारी होती. ड्रेसिंग रुममध्ये संजू पोहोचताच त्याने बॅटला चूंबन केले अन् ती अलगद आपल्या किटमध्ये ठेवली. हा सर्वक्षण नजरेत कैद करणारा होता... संजूच्या अविस्मरणीय खेळीने भारताला उपांत्य फेरीत पोहोचवले होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ५ मार्चला भारत विरुद्ध इंग्लंड असा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.

विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९५ धावा कुटल्या... अभिषेक शर्माने दोन सोपे झेल टाकल्याने ते इथपर्यंत पोहोचू शकले. रोस्टन चेस ( ४०), शे होप ( ३२) यांच्या सावध सुरुवातीनंतर शिमरोन हेटमायर ( २७), रोव्हमन पॉवेल ( नाबाद ३४) व जेसन होल्डर ( नाबाद ३७) यांच्या आक्रमक फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांना चांगला चोप दिला. जसप्रीत बुमराहने ३६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग ( ४३) महागडा ठरला. हार्दिक पांड्या व वरूण चक्रवर्थी यांनी प्रत्येकी ४० धावा देत १-१ विकेट घेतली.

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

अभिषेक शर्मा ( १०) व इशान किशन ( १०) स्वस्तात माघारी परतूनही संजू सॅमसन मैदानावर उभा राहिला. त्याने सूर्यकुमार यादव ( १८) सह संघाचा डाव सावरला. त्यानंतर तिलक वर्माची ( २७) त्याला मिळालेली साथ टर्निंग पॉइंट ठरली. दुसऱ्या बाजूने विकेट पडत असताना संजू शेवटपर्यंत मैदानावर उभा राहिला. हार्दिक पांड्या ( १७) शिवम दुबे ( ८) यांनीही योगदान दिले. संजूने ५० चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९७ धावांची खेळी केली. भारताने १९.२ षटकांत ५ बाद १९९ धावा करून विजय मिळवला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.