आयुष्मान कार्डधारक वैद्यकीय सेवेपासून वंचित
esakal March 02, 2026 04:45 AM

आयुष्मान कार्डधारक वैद्यकीय सेवेपासून वंचित
गरीब रुग्णांना नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा
आमदार संजय केळकर यांची विधानसभेत कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र आयुष्मान कार्डधारक गरीब कुटुंबांना शासनाच्या सूचित असलेली रुग्णालये वैद्यकीय सेवा देण्यास नकार देत असल्याची गंभीर बाब आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संजय केळकर यांनी विधानसभेत केली.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांचा विमा, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या रुग्णांवर कॅशलेस उपचार, आधीपासून आणि नंतर झालेल्या आजारांवरही उपचार देणे शासनाच्या सूचीतील रुग्णालयांना बंधनकारक आहे. या योजनेनुसार ठाणे शहरात शेकडो शिबिरे आयोजित करून पात्र कुटुंबांना आयुष्मान कार्ड वाटप केले. परंतु, शासनाच्या सूचीतील नोंदणीकृत रुग्णालयातही या रुग्णांना दाखल करून वैद्यकीय सेवा दिली जात नसल्याने आम्ही शिबिरे बंद केली. रुग्णालयांच्या नकारघंटेमुळे गरीब रुग्ण उपचारापासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब संजय केळकर यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिली. धर्मादाय रुग्णालये देखील या रुग्णांना दाखल करून घेत नाहीत. दरपत्रक बदलल्याशिवाय या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणार नाहीत, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. केवळ ठाणेचं नव्हे तर संपूर्ण एमएमआर क्षेत्रात अशी स्थिती असून सूचित असलेल्या परंतु रुग्णांना या योजनेंतर्गत वैद्यकीय सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली. तसेच मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांना देखील या योजनेत समाविष्ट करून घेण्याची मागणी केळकर यांनी केली.

२४ रुग्णालयांची नोंदणी रद्द
यावर उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एमएमआर क्षेत्रातील या समस्येसाठी लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांनीही या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सूचीतील ज्या रुग्णालयांनी रुग्णांना सेवा देण्यास नकार दिला, अशा २४ रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्यात आली असून ७५ रुग्णालयांना सूचीबद्ध यादीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती मेघना बोर्डीकर यांनी दिली.

वरसाळे-नवापाडा रस्त्यावर भ्रष्टाचाराची खडी
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये वरसाळे-नवापाडा या तीन किमीच्या रस्त्याचे काम अनेकदा नवनवीन कंत्राटदारांकडून करण्यात येते, अशी स्थानिकांची माहिती आहे. आता २०२४मध्ये या रस्त्याच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र, अद्याप हा रस्ता पूर्ण झाला नसून झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संजय केळकर यांनी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.