पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) खेडमध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध कारवाई करत तब्बल ९२ लाख ९८ हजार रुपयांचे पदार्थ जप्त केले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये हा साठा हस्तगत करण्यात आला.
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गात बदल निश्चित! सोलापूर जिल्ह्यापासून नवा मार्ग, मुख्यमंत्र्यांनी सांगितला कसा असेल बदल..एफडीएला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी प्रथम खेडमधील महाळुंगे एमआयडीसी येथील मे. आझमी वेट ब्रिज येथे छापा टाकला. तेथे त्यांना विक्री व वितरणासाठी साठवून ठेवलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. तसेच एक बोलेरो मॅक्स पिकअप या वाहनातून या पदार्थांची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान ७२ लाख १७ हजार १३१ रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा व ७ लाख रुपयांचे वाहन, असा एकूण ७९ लाख १७ हजार १३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनमालक सिराज नूर आलम तसेच अज्ञात जागामालकाविरुद्ध म्हाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Pune News: वाहने राज्यातच, फिटनेस परराज्याचा; आरटीओ अधिकारी-दलालांचे संगनमत, कागदोपत्री तपासणीमुळे सुरक्षा धोक्यात!
दरम्यान, एफडीएने दुसरी कारवाई पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील आनंद सेल्स येथे केली. विक्रीसाठी आलेला गुटखा व पान मसाल्याच्या वाहनातून १२ लाख ३० हजार ९५० रुपयांचा प्रतिबंधित साठा व १ लाख ५० हजार रुपयांचे वाहन असा एकूण १३ लाख ८० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनमालक प्रज्वल सुदर्शन मुथा व रामस्वरूप यांच्याविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती एफडीएचे सह आयुक्त दि. वा. भोगावडे यांनी दिली