‘पांग मराठीचे’ कार्यक्रमाद्वारे मराठी भाषेचा जागर
एसएसटी महाविद्यालयात काव्यवाचन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण, ता. १ (वार्ताहर) : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त, एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या कला विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित ‘पांग मराठीचे’ या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी जितेंद्र लाड यांनी आपल्या काव्यप्रतिभेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
प्रमुख पाहुणे कवी जितेंद्र लाड यांनी आपल्या सुमधुर शैलीत मागील पिढीचा वारसा आणि आजच्या पिढीची जीवनशैली यावर भाष्य केले. त्यांनी कवितेच्या माध्यमातून स्वतःचा जीवनप्रवास मांडतानाच विद्यार्थ्यांना भाषेचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी संदेश दिला. उपप्राचार्य डॉ. दीपक गवादे यांनी कुसुमाग्रज आणि मंगेश पाडगावकर यांच्या कविता सादर करून वातावरणात चैतन्य भरले. महाविद्यालयातील अ-मराठी प्राध्यापकांनी मराठीतून शुभेच्छा देणाऱ्या ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) प्रदर्शित केल्या, ज्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठी सण, इतिहास आणि भाषेवर आधारित प्रश्नोत्तरांच्या चित्रफितींचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह म्हणून पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रम संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी उपप्राचार्य डॉ. संतोष करमानी, प्रा. जीवन विचारे, प्रा. देविदास जळकोटे, कला विभाग प्रमुख डॉ. तुषार वाकसे, प्रा. सचिन फाळके आणि प्रा. प्रफुल केदारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल केदारे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय डॉ. हर्षदा दरेकर यांनी करून दिला, तर डॉ. सुवर्णा अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पुस्तकांची शिदोरी
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कविता सादर केल्या. मराठी भाषा, मराठी सण-उत्सव, मराठी मातीचा इतिहास या विषयांवर विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या चित्रीत ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील अ-मराठी प्राध्यापकांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठीतून दिलेल्या शुभेच्छा व्हिडिओच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आल्या, ज्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांना शिदोरी म्हणून पुस्तके भेट देण्यात आली.