रावेत परिसरात स्वच्छतेचा जागर
esakal March 02, 2026 09:45 AM

रावेत, ता.१ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा) तर्फे रावेत परिसरात रविवारी (ता.१) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाला गती देत आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हजारो श्री सदस्यांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सकाळी ७ वाजल्यापासूनच रावेतमधील मुकाई चौक, भोंडवे वस्ती, रावेत गावठाण आणि बीआरटीएस मार्ग परिसरात प्रतिष्ठानचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने जमले. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सदस्यांनी रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा, प्लॅस्टिक, पालापाचोळा आणि राडारोडा उचलला. काही तासांतच संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदललेला पाहायला मिळाला.
या मोहिमेदरम्यान गोळा करण्यात आलेला ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये साठवून तो महानगरपालिकेच्या घंटागाड्यांकडे सोपवण्यात आला. प्लॅस्टिकच्या वाढत्या प्रदूषणाबद्दल जनजागृती करत परिसरातील सार्वजनिक ठिकाणे, शाळांच्या भिंती आणि उद्याने स्वच्छ करण्यात आली. संस्थेतर्फे केवळ स्वच्छताच नव्हे, तर वृक्षारोपण आणि जलसंधारणाचे कार्यही अविरत सुरू असते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.