कुरकुंभ, ता. १ : पुणे-सोलापूर महामार्गावरील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कुरकुंभ (ता. दौंड) येथील ग्रामदैवत फिरंगाई देवीचा पारंपरिक गोंधळ सोहळा रविवारी (ता. १) उत्साहात झाला. या उत्सवासाठी दौंड तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांतून भाविकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ६ वाजता श्रींच्या मूर्तीला पंचामृत स्नान आणि पूजेने झाली. त्यानंतर सकाळी १० वाजता शिर्सुफळ (ता. दौंड) येथील गोंधळी महादेव मुळे आणि त्यांच्या संचाने देवीचा पारंपरिक ‘गोंधळ’ सादर केला. खड्या आवाजातील देवीची गाणी, पोवाडे आणि भक्तिपूर्ण आराधनेने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी १२ वाजता पुणे येथील अशोकराव खरात यांच्या हस्ते देवीची मुख्य महाआरती करण्यात आली.
गावातील वंशपरंपरागत पुजारी, भगत आणि गुरव समाज बांधवांसह ग्रामस्थांनी या उत्सवाचे नियोजन केले होते. महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारी ही परंपरा कुरकुंभ ग्रामस्थांनी श्रद्धेने आणि एकजुटीने पार पाडली.
विजयाचा ऐतिहासिक वारसा
इतिहासात असे मानले जाते की, जेव्हा हंबीरराव मोहिते एखाद्या मोठ्या मोहिमेवरून विजय मिळवून परतत होते, तेव्हा ते आपल्या फौजेसह कुरकुंभला येत होते. तेव्हा देवीला अभिषेक घालून तिथे ‘मोठ्या मानाचा गोंधळ’ घातला जात असे. या गोंधळात स्वतः हंबीरराव आणि त्यांचे मावळे सहभागी होत. देवीची गाणी, पोवाडे आणि संबळाच्या कडकडाटात स्वराज्याच्या विजयाचा जल्लोष केला जाई. हा गोंधळ म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून, सैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा आणि ‘स्त्री शक्ती’चा सन्मान करण्याचा एक मार्ग होता. याच ऐतिहासिक स्मृतीला कुरकुंभ ग्रामस्थांनी पुन्हा एकदा उजाळा दिला.