टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने आनंद साजरा केला जात आहे. तसेच संजू सॅमसन याने एकट्याच्या जोरावर नाबाद 97 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताचा हा आनंद द्विगुणित झालाय. आता टीम इंडिया उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. मात्र भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सामन्यात झालेल्या एका कृतीमुळे समालोचक आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केला आहे. शास्त्री-गावसकर या टीम इंडियाच्या आणि मुंबईच्या माजी क्रिकेटपटू जोडीने कशावरुन संताप व्यक्त केलाय हे जाणून घेऊयात.
उभयसंघातील सामन्यात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान लेजर शो पाहायला मिळाला. यावरुन रवी शास्त्री आणि सुनील गावसकर संतापले. शास्त्री आणि गावसकर यांनी या लेजर शोचं सामन्यादरम्यान आयोजन करण्याची काय गरज होती असा प्रश्न उपस्थित केला आहे. या लेजर शोमुळे खेळाडूंची एकाग्रता भंग होते, अशी चिंताही या दिग्गज जोडीने व्यक्त केली. हा सर्व प्रकार सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान घडला.
विंडीजने टीम इंडियासमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने पावरप्लेमध्ये 2 विकेट्स गमावून 53 धावा केल्या. त्यानंतर 3 मिनिटांचा ब्रेक झाला. या दरम्यान स्टेडियममधील मोठ्या लाईट बंद करण्यात आल्या. त्यानंतर लेजर शो ला सुरुवात झाली. त्यामुळे काही सेकंद स्टेडियममध्ये काळोख झाल्याचं पाहायला मिळालं. या अचानकपणे झालेल्या बदलामुळे फलंदाजांना दृष्टीवर परिणाम होईल, अशी चिंता गावसकर-शास्त्री यांनी व्यक्त केली.
ड्रिंक्स ब्रेकच्या अडीच ते 3 मिनिटांदरम्यान लेजर शो. या लेजर शोमुळे फलंदाजासाठी बॅटिंग करणं सोपं नाही. तसेच ते सामन्यांसाठीही अवघड असल्याचं गावसकर यांनी म्हटलं. तसेच जागितक स्पर्धेत असल्या तमाशाची गरज नाही, अशा शब्दात गावसकर यांनी जाहीररित्या कॉमेंट्रीदरम्यान संताप व्यक्त केला.
इथे लेजर शो चाललाय. ही वर्ल्ड कप स्पर्धा आहे. तसेच अडीच ते 3 मिनिटांच्या विश्रांती दरम्यान अशा प्रकारच्या मनोरंजनाची काय गरज आहे? आयपीएल दरम्यान हे सर्व ठीक आहे. मात्र बाद फेरीतील सामन्यात नाही, अशा स्पष्ट शब्दात गावसकरांनी आपली नाराजी व्यक्त केली.
तसेच रवी शास्त्री यांनी गावसकरांसह सहमती दर्शवली. खेळाडूंच्या दृष्टीने विचार केला तर अशा लेजर शो मुळे पुन्हा खेळावर लक्ष केंद्रीत करणं अवघड जात. हा गंभीर विषय आहे, असं शास्त्रींनी म्हटलं.