Sanju Samson : पत्रकार परिषदेत थट्टा उडवणारा कॅप्टन सूर्या संजूसमोर झुकला, फोटो व्हायरल
GH News March 02, 2026 10:12 AM

वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे वाक्य टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याला तंतोतंत लागू पडतं. संजू टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटच्या 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध अपयशी ठरला. त्यामुळे ऐन क्षणी संजूला वर्ल्ड कपच्या प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू देण्यात आला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने साखळी फेरीतील सामन्यांदरम्यान पत्रकार परिषदेत संजूला संधी देण्यावरुन टिंगल उडवली होती. त्याला संधी द्याची? असं म्हणत सूर्याने संजूला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संजूने यावर व्यक्त न होता आपल्या कामगिरीने धमाका केला.

संजूने निर्णायक सामन्यात इतर भरोशाचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मॅचविनर म्हणून भूमिका पार पाडली. संजूने रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध 196 धावांचा पाठलाग करताना चौकार ठोकून टीम इंडियाला जिंकवलं. संजूने नाबाद 97 धावा केल्या. संजूच्या या खेळीच्या जोरावर भारताने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. संजूचं या खेळीनंतर सर्वच स्तरातून अभिनंदन केलं गेलं.

संजूने कॅप्टन सूर्याला झुकवलं

विजयानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांसह हस्तांदोलन केलं. संजू आण शिवम दुबे मैदानाबाहेर जात होते. तर टीम इंडियातील इतर खेळाडू मैदानात येत होते. या दरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादव याने संजू समोर येताच डोक्यावरुन टोपी काढली. सूर्या संजूसमोर नतमस्तक झाला आणि त्याच्या खेळीला दाद दिली. सूर्या संजूसमोर नतमस्तक झाल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

संजूची नाबाद 97 धावांची चाबूक खेळी

संजू इडन गार्डन्समध्ये 196 रन्सचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंगला आणि भारताला विजयी करुन नाबाद परतला. संजूने फक्त 50 बॉलमध्ये 194 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 97 रन्स केल्या. संजूने या खेळीत 4 सिक्स आणि 12 फोर ठोकले. संजूला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सूर्यकुमार संजूबाबत पत्रकार परिषदेत काय म्हणाला होता?

साखळी फेरीत अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा हे टॉप ऑर्डरमधील फलंदाज धावांसाठी संघर्ष करत होते. त्यामुळे पत्रकाराने कॅप्टन सूर्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदलाबाबत प्रश्न करत संजूला स्थान देणार का? असा प्रश्न केला होता. संजूला ओपनिंग किंवा तिसऱ्या स्थानी संधी देणार का? असा प्रश्न केला. यावर सूर्याने त्याच्यासाठी (संजू) अभिषेकला/तिलकला बाहेर करु? असं कुत्सितपणे पत्रकारालाच प्रतिप्रश्न केला होता.

मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच परिस्थिती बदलली. कॅप्टन सूर्या आणि हेड कोच गंभीर या दोघांनी संजूपेक्षा तिलक आणि अभिषेकवर विश्वास दाखवला. मात्र दोघेही ढेर ठरले. मात्र संजूने निर्णायक क्षणी आपला अनुभव दाखवला आणि मॅचविनरची भूमिका बजावली. संजूने अशाप्रकारे आपल्या खेळीच्या जोरावर न बोलता सूर्याला खूप काही दाखवून दिलं, अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.