Shimgotsav Night Games: मोबाईल गेमिंगच्या युगातही रामपेठेत टिकून आहे या अनोख्या खेळाची परंपरा; शिमगोत्सवात रात्रभर रंगतो जागर
esakal March 02, 2026 05:45 PM

Traditional Konkani Atya Patya Game of Holi: मोबाईल गेमिंग आणि क्रिकेटच्या वाढत्या प्रभावात सध्याची पिढी जुने पारंपरिक खेळ विसरत चालली आहे, अशी खंत व्यक्त केली जाते. मात्र, कोकणच्या ग्रामीण भागात आजही अनेक पारंपरिक खेळ मोठ्या उत्साहाने जोपासले जात आहेत. संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजार परिसरात फाकपंचमीपासून 'आट्यापाट्या' या खेळाची धूम सुरू असून, तरुणाई या माध्यमातून 'होलिकोत्सवा'च्या जुन्या परंपरा जपताना दिसत आहे.

होळीच्या दिवसांत दररोज रात्री १० ते पहाटे २ पर्यंत सुमारे ४० ते ५० मुले रामपेठ येथे एकत्र येतात. विशेष म्हणजे, मोठी मुले लहान मुलांना या खेळाचे नियम आणि महत्त्व समजावून सांगत त्यांना खेळात सामावून घेतात. शारीरिक हालचाली आणि अचूक टायमिंगवर आधारित या खेळामुळे उत्तम व्यायाम होतो. फाल्गुन महिना सुरू झाला की, इथल्या सवंगड्यांच्या डोळ्यांसमोर आट्यापाट्यांचे मैदान उभे राहते.

Mathura Holi: होळीसाठी मथुरेला जाताय? ४० दिवस चालतो रंगांचा पाऊस; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा 'या' टिप्स

आट्यापाट्या हा अस्सल महाराष्ट्रीय मैदानी खेळ आहे. यात एका संघाने दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेत (पाटीत) अडवणे आणि प्रतिस्पर्धी खेळाडूने हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी याची स्थूल रूपरेषा असते.

या खेळात 'कोंडी', 'हुलकावणी' आणि 'शिवाशिवी' अशा प्रकारांचा समावेश होतो.

असे खेळतात आट्यापाट्या

खेळाचे मैदान 'सूरपाटी' व अन्य नऊ पाट्यांमध्ये विभागलेले असते. जेथून खेळ सुरू होतो, तिला 'कपाळपाटी' आणि शेवटच्या पाटीला 'लोणपाटी' म्हणतात. मैदानाला मधून दुभागणाऱ्या पाटीला 'मृदंगपाटी' किंवा 'सूरपाटी' म्हटले जाते. या खेळात प्रत्येकी नऊ खेळाडूंचे दोन संघ असतात. अधिकृत सामन्यांमध्ये आठ पंच, एक सरपंच, वेळाधिकारी आणि गुणलेखक अशी यंत्रणा असते.

Holi 2026: होळी का साजरी करतात माहीत आहे? जाणून घ्या इतिहास एकाच क्लिकवर

संगमेश्वरमधील मुले दरवर्षी विविध सणांच्या परंपरा जपण्यात आघाडीवर असतात. होळीच्या दिवसांत रात्री उशिरापर्यंत रंगणारा हा आट्यापाट्यांचा खेळ विनाखंड सुरू आहे. जुन्या परंपरा जपणे आणि त्या पुढच्या पिढीला शिकवणे, हीच सणांची खरी शिकवण आहे.

- अमोल शेट्ये, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते, रामपेठ, संगमेश्वर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.