IPL 2026 आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! डावखुरा अष्टपैलू संपूर्ण सिजनला मुकणार
esakal March 02, 2026 05:45 PM

इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. पण अद्याप अधिकृत वेळापत्रक समोर आलेले नाही. पण असे असले तरी सर्व संघांच्या तयारीला सुरुवात झाली आहे, कारण आता या स्पर्धेसाठी आता महिनाभराचा कालावधीही उरलेला नाही.

अशातच आता पाचवेळचे विजेत्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians)मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू अथर्व अंकोलेकर (Atharva Ankolekar) आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर झाल्याचे समजत आहे.

IPL 2026: CSK च्या तयारीला सुरुवात! धोनीसह कर्णधार ऋतुराजची महाराष्ट्राच्या 'धुरंधरां'सोबत चेन्नईत एन्ट्री; पाहा Video

मुंबई इंडियन्सने अथर्वला आयपीएल २०२६लिलावात ३० लाखांच्या किंमतीत खरेदी केले होते. पण त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आता अर्थर्व त्याच्या पहिल्याच आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही.

नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामादरम्यान जानेवारीमध्ये मुंबईकडून हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो क्षेत्ररक्षणावेळी चौकार आडवताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध डॉक्टर दिनशॉ परडीवाला यांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे.

अथर्व अंकोलेकर मुंबई क्रिकेट वर्तुळात गेल्या काही वर्षात चर्चेत असलेले नाव आहे. त्याने २०२० मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्येही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो.

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

त्याने आत्तापर्यंत ३ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ९६ धावा केल्या आहेत आणि १ विकेट घेतली आहे. त्याने १५ लिस्ट ए सामन्यांत १६१ धावा आणि १६ विकेट्स घेतल्या आहेत. तो २५ टी२० सामनेही खेळला आहे. त्यात त्याने १५६ च्या स्ट्राईक रेटने १३५ धावा केल्या असून १९ विकेट्स घेतल्या आहेत.

तो काही वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्स संघात नेट बॉलर म्हणून सहभागी झाला होता, पण त्यानंतर त्याला मुंबईने २०२६ हंगामासाठी संघात खेळाडू म्हणून घेतले होते. मात्र आता त्याला या हंगामाला मुकावे लागणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.