पुणे : इराण आणि इस्राईल यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे मध्यपूर्व देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा थेट फटका पुण्यासह राज्यातील पर्यटकांना बसला आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर परतीची व्यावसायिक उड्डाणे रद्द झाल्याने अनेक पर्यटक दुबईत अडकून पडले आहेत.
आम्ही भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने विशेष विमाने पाठवून आमची मायदेशात आणण्याची व्यवस्था करावी आणि वाढत्या खर्चातून दिलासा द्यावा,’ अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे.
‘कॅप्टन इंडिया टुर्सच्या माध्यमातून ४० पर्यटकांचा एक गट २५ तारखेला रात्रीच्या विमानाने दुबईला गेला होता. २६ तारखेपासून त्यांची सहल सुरळीत सुरू होती. मात्र, अचानक युद्ध भडकल्याने आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या पर्यटकांचे २ तारखेला रात्री साडेदहाचे परतीचे उड्डाण होते. मात्र हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने ते रद्द करण्यात आले.
परिणामी, हा संपूर्ण गट सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकून पडला आहे. दुबईत अडकलेल्या या ४० जणांच्या गटामध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ३० पर्यटक हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील आहेत. यामध्ये प्राधिकरण, देहूरोड, सांगवी, जुनी सांगवी, नऱ्हे आणि आंबेगाव परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या गटामध्ये पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका सुमन नेटके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षा उषा नेटके यांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त नाशिक, मुंबई आणि दिल्लीतील काही पर्यटकांचा या गटात समावेश आहे.
अनिता नेटके म्हणाल्या, ‘‘युद्ध सुरू झाल्यानंतर आम्ही थेट भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला उत्तर दिले असून, ‘सुरक्षित राहा आणि हॉटेलच्या रूममध्ये थांबा,’ अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, आम्ही येथे पर्यटक म्हणून आलो असल्याने आमच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. विमान उड्डाणे रद्द झाल्याने आमची मोठी कोंडी झाली आहे. भारत सरकारने बचावकार्यात पर्यटकांना प्राधान्य द्यावे आणि आम्हाला लवकरात लवकर येथून बाहेर काढून मायदेशी न्यावे.’’
दुबईतीलच दुसऱ्या एका हॉटेलमध्ये पुण्यातील आणखी १० नागरिकांचा गट अडकून पडला आहे. या गटातील एका सदस्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत मदतीसाठी साद घातली आहे. किशोर कुलकर्णी म्हणाले, ‘‘आमचे रविवारी परतीचे विमान होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे उड्डाण अचानक रद्द झाल्याने आम्हाला हॉटेलमध्येच अडकून पडावे लागले आहे. आम्ही तातडीने भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद किंवा मदत मिळाली नाही.’’
Kolhapur Election : कुठे विकासाचा कौल, कुठे गटबाजीचा फटका; नगरपालिकांच्या निकालांतून स्पष्ट झाले स्थानिक राजकारणमाझी आई, काकू व किवळे परिसरातील साधारण १८ जण पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. युद्धजन्य परिस्थितीमुळे ते अडकून पडले आहेत. सोमवारी त्यांचे परतीचे विमान होते. रविवारी सायंकाळी पाचला त्यांच्याशी बोलणे झाले. सर्वजण सुरक्षित आहेत. दुबई येथील बुर्ज खलिफा बघून हाॅटेलवर पोहोचल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. सुदैवाने सर्व जण सुखरूप आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या संपर्कात आहोत, असे पिंपरी चिंचवडच्या किवळे विकासनगर येथील माजी नगरसेविका सुमन नेटके यांचे चिरंजीव राहुल नेटके यांनी सांगितले.