पुणे : ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’च्या (सारथी) दिरंगाईमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा आणि कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसमोर उभे राहिलेले आर्थिक संकट (SARATHI Scholarship 2025) अखेर दूर झाले आहे. ‘सकाळ’ने या प्रश्नावर सातत्याने उठवलेला आवाज आणि विधिमंडळात उमटलेले त्याचे पडसाद, यामुळे प्रशासनाला अखेर जाग आली आहे.
‘सारथी’ने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ‘डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजने’ची जाहिरात रविवारी (ता. १) अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. यामुळे कर्ज काढून शिक्षण पूर्ण करण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशातील अव्वल २०० शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’तर्फे ही शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. मात्र, २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आले तरी या योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. यामुळे विद्यार्थ्यांवर वसतिगृह, खानावळ आणि महाविद्यालयाची फी भरण्यासाठी मोठा आर्थिक ताण आला होता. ‘सारथी’च्या या दिरंगाईवर ‘सकाळ’ने ‘शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या.
Pune Metro Expansion : कोंढवा-येवलेवाडीकरांची चांदी! आता थेट मेट्रोने प्रवास; दक्षिण पुण्याचा कायापालट करणारा 20 किमीचा 'मेगा प्लॅन' तयार, कुठून-कसा असेल मार्ग?‘सकाळ’च्या या वृत्ताची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला धारेवर धरले. यावर उत्तर देताना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी ३१ मार्चपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करून निधी वितरित करण्याची ग्वाही विधीमंडळात दिली होती. या आश्वासनाची पूर्तता करत १ मार्च रोजी ‘सारथी’ने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘सारथी’ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, देशातील नामांकित २०० शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश घेतलेल्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना पूर्णवेळ प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज मागविण्यात आले आहेत.
Dr. Janardan Waghmare : साहित्य आणि शिक्षण क्षेत्राचा महामेरू हरपला! माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे 91 व्या वर्षी निधन; 'असा' होता त्यांचा जीवनप्रवास!जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च असून, अधिक माहितीसाठी सारथीच्या sarthi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सारथीचे व्यवस्थापकीय संचालक सुरज मांढरे यांनी केले आहे.
SARATHI Scholarship
सारथीची शिष्यवृत्ती हा आमच्यासाठी एकमेव आधार होता. जाहिरात रखडल्याने प्रचंड आर्थिक ताण आला होता. मात्र, ‘सकाळ’ने आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला आणि आज जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यामुळे माझ्यासारख्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- मृणाल कदम, विद्यार्थिनी
शिष्यवृत्तीचे स्वरूपदेशातील अव्वल २०० शैक्षणिक संस्थांतील ३०० विद्यार्थ्यांना लाभ
संबंधित शिक्षण संस्थेचे पूर्ण शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती
परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक व विकास शुल्क समाविष्ट
पुस्तकांसाठी ५ हजार अतिरिक्त मदत
शैक्षणिक साहित्यासाठी १० हजार अतिरिक्त मदत