Manoj Jarange Patil : वर्षभर आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार असून समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचे काम हाती घेतले आहे. मी समाजासाठी लढतोय म्हणून मला रोज धमक्या देण्यात येत आहेत. माझे कुटुंबही यात डावावर लागले आहे. पण मी मरणाला भीत नाही, असं मोठं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलंय. करमाळ्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
करमाळा (Karmala) तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे येथे शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनाला मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी करमाळा येथील शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते.
Manoj Jarange Patil : आता वर्षभर दौरे बंद, समाजासाठी नवीन योजना
वर्षभर आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार असून समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचे काम हाती घेतले असल्याचे जरांगे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाज बांधवाला अडचण आल्यास पंधरा मिनिटात त्या ठिकाणी मदत उभी राहील, अशी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून वर्षभर हेच काम पूर्ण करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करा. मला माझे काम करू द्या, असे आवाहनही जरांगे यांनी समाज बांधवांना केले.
Manoj Jarange Patil : कधी कोणी येऊन मला मारून टाकेल, याची कल्पनाही नाही
दरम्यान, माझे संपूर्ण कुटुंब डावावर लागले आहे, कधी कोणी येऊन मला मारून टाकेल याची कल्पनाही नाही. पण मी समाजासाठी उतरलो आहे. कोण म्हणतंय भंडारा लावून मारणार, रोज अशा धमक्या पाचोळ्या सारख्या येतात. मी त्याला भीक घालत नाही. माझा समाज गावोगावी असून धमक्या देण्यापेक्षा समोर येऊन लढ, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका
कायम टिकेल असे काहीतरी मागा. लाडकी बहिणीला दिलेले पंधराशे रुपये पुरतात का? बाजारात जाईपर्यंत उडून जातात. हीच किंमत आपल्या लेकरा बाळांची केली आहे का? अशा शब्दात मनोज जरांगे यांनी लाडक्या बहिणी योजनेवर ही सडकून टीका केली. मी जातपात पाहत नाही, तसे असते तर महादेव मुंडेच्या कुटुंबासाठी मी लढलो नसतो. माझ्यामुळे दाबलेली केस उघडी झाली आणि आता आरोपींना जेलमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू झाली, असा टोलाही त्यांनी लगावला.
Manoj Jarange Patil : गाडीतून खाली उतरवले तर माझ्याकडे रिक्षाचे पैसेही नाहीत
आपल्यावर सातत्याने काही दुकानदार माध्यमातून गबाळ उचलण्याची टीका करतात. मात्र या सर्व गाड्या समाजाच्या आहेत. मला जर यांनी गाडीतून खाली उतरवले तर माझ्याकडे रिक्षाला सुद्धा पैसे नाहीत, असा टोलाही टीका करणाऱ्यांना जरांगे यांनी लगावला. लाथ मारेन तिथून पाणी काढून दाखवेन त्यामुळे शेतकऱ्यांनी आता माझ्यासोबत हाक दिली की एकत्र यावे. मग बघतो कशी कर्जमाफी मिळत नाही. कसे हमीभाव मिळत नाहीत. कशी पिक विमा रक्कम मिळत नाही आणि कसे दुधाला भाव मिळत नाहीत. फक्त तुम्ही एकत्र या, मी तुम्हाला मिळवून देईल, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.