Saptashrungi Gad : सप्तशृंगी चरणी २५ हजार भाविक नतमस्तक; हुताशनी पौर्णिमेनिमित्त भगवतीचा मनमोहक साजशृंगार
esakal March 03, 2026 04:45 PM

वणी: ‘अंधकार नाशवी ज्वाळा भिडली गगनाला तैसे तेज प्रकाशे जगदंब मुखाला.., सप्तशिखर पर्वतासमोर मार्कंडेय वेढिला सप्तशृंगी अंबा प्रत्यक्ष होळी पूजनाला...’ आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर सोमवारी (ता. २) हुताशनी पौर्णिमा अर्थात, होळी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी झाली. या मंगल पर्वावर सुमारे २५ हजार भाविक सप्तशृंगीमातेच्या चरणी नतमस्तक झाले. गडावरील पारंपरिक प्रथेनुसार, सायंकाळी साडेसातच्या सुमारास विधिवत होळी प्रज्वलित करण्यात आली.

हुताशनी पौर्णिमेनिमित्त सोमवारी सकाळी सप्तशृंगी निवासिनी देवी न्यासाच्या कार्यालयात देवीच्या सुवर्ण आभूषणांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत मिरवणुकीने ही भूषणे मंदिरात नेण्यात आली. सकाळी नऊला पंचामृत महापूजा व आरती झाली. आज भगवतीला जांभळ्या रंगाची जरतारी पैठणी परिधान करण्यात आली होती. श्री भगवतीस सुवर्ण अलंकारासह साखरेच्या गाठीचे अलंकार, विविध फुलांचे हार घालून साजशृंगार करण्यात आल्याने श्री भगवतीची मूर्ती तेजस्वी आणि मनमोहक दिसत होती.

हुताशनी पौर्णिमेनिमित्त मुंबई येथील भाविक प्रतीक नार्वेकर यांच्या माध्यमातून आणि सजावटकार शंकरराव जुन्नरे यांच्या संकल्पनेतून मंदिर गाभाऱ्यात निसर्गरम्य सजावट करण्यात आली होती. सूर्यफुलांची तोरणमाळ, तसेच विविध रंगी व प्रकारच्या फुलांचे झुंबर यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर झेंडूची आणि निळ्या-जांभळ्या फुलांची आकर्षक कमान भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

Beed Holi Tradition: शहिदांच्या स्मृतींना उजाळा देणारी किल्लेधारूरची पारंपरिक होळी; सलग पाच दिवस पेटत राहते होळी

धोडपच्या होळीनंतर गडावर प्रज्वलन

सप्तशृंगगडावरील होळीच्या परंपरेला ऐतिहासिक महत्त्व आहे. परंपरेनुसार, सप्तशिखर पर्वत रांगेतील धोडप किल्ल्यावर होळी पेटल्यानंतरच गडावरील मुख्य होळी प्रज्वलित केली जाते. त्याप्रमाणे सायंकाळी सातच्या सुमारास मंदिर समोरील यज्ञ मंडपात पुरोहितांच्या मंत्रघोषात होळीचे पूजन झाले. या वेळी ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, पुरोहित संघ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.