धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरात रंगांची उधळण
esakal March 03, 2026 07:45 PM

पिंपरी, ता. ३ ः धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरात रंगांची उधळण पाहायला मिळाली. तरुणाई मनसोक्तपणे संगीताच्या तालावर थिरकताना दिसली. ग्रहण असले तरी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत रंग, पाणी आणि आनंदाच्या उधळणीत सर्वच जण रंगून गेले होते. त्यांच्यात ‘रंग बरसे’चा उत्साह आणि जोश दिसत होता. सकाळपासूनच शहरांमधील गल्ली, रस्ते, कॉलनी, मॉल, लॉन, चौक आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत रंगोत्सवाचे उत्साही चित्र पाहायला मिळाले.
रस्त्याच्या कडेला रंग विकणाऱ्यांची गर्दी झालेली होती. मातीच्या रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. तर सिल्वर, ब्लॅक, सोनेरी या रंगानाही चांगली मागणी होती. शहरातील निगडी, आकुर्डी, रावेत, मोशी, भोसरी, कासारवाडी, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, पिंपरी, चिंचवड, रावेत, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, किवळे या भागांमधील मोठ्या टाऊनशिप व सोसायट्यांमधील रहिवाशांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी लावण्यात आलेल्या ‘डीजे’ च्या तालावर नागरिकांनी ठेका धरला. तर काही ठिकाणी विशेष सांगितीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. ओम गणेश सोसायटी आणि केशवनगर चिंचवड येथील अन्य सोसायट्यांमध्ये देखील धुलिवंदन जल्लोषात साजरा केला.

तरुणांकडून मनसोक्त आनंद
शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने रंगामध्ये मनसोक्त आनंद लुटला. कार्यालये व महाविद्यालयांना सुटी असल्याने तरुणांनी आपल्या मित्रमंडळींसोबत धुमधडाक्यात धुलिवंदन साजरे केले. तरुणांनी हॉस्टेलच्या आवारात संगीताच्या तालावर थिरकत जल्लोषात धुलिवंदन सण साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई एकत्र जमल्याचे पाहायला मिळाले आहे. आम्ही या सणाचा आनंद घेत आहोत, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

मांसाहारावर ताव
धुलिवंदनानिमित्त शहरातील मटण आणि चिकनच्या दुकानांत गर्दी पाहायला मिळाली. होळीला पुरणपोळी खाल्ल्यानंतर काही भागात धुलिवंदनाच्या दिवशी मांसाहार करण्याची परंपरा असल्याने मासे, चिकन, मटण आदी दुकानांबाहेर सकाळीच ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. मटणाचे दर ७०० ते ९०० रुपये किलोवर पोहोचले होते. मागणी वाढल्याने मटण आणि चिकनच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.


पोलिस प्रशासनाचा ‘वॉच’
धुलिवंदनाच्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात कडक बंदोबस्त तैनात केला होता. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी ‘नाकाबंदी’ करण्यात आली होती. तर, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस जागोजागी लक्ष ठेवून होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे हा सण उत्साहात पार पडला. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीही प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.