Atharva Birari : नवलच! वयाच्या २२ व्या वर्षी नाशिकचा अथर्व बिरारी झाला 'सीए'; पहिल्याच प्रयत्नात देशात ४० वा!
esakal March 03, 2026 07:45 PM

नाशिक: अत्यंत खडतर व कठीण समजल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षेत सर्वसामान्य कुटुंबातील अथर्व बिरारी याने घवघवीत यश मिळविले आहे. सनदी लेखापाल होण्यासाठीच्या सर्व परीक्षा अर्थात फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम अशा सर्व टप्प्यांवर पहिल्या प्रयत्नात यश मिळविताना त्याने वयाच्या २२ व्या वर्षी यशोगाथा रचली.

सीए अंतिम परीक्षेत अथर्वने नाशिकमध्ये द्वितीय, तर राष्ट्रीय पातळीवर ४० वा क्रमांक पटकावला आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेल्या अथर्वचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल. त्याचे वडील कैलास बिरारी स्क्रीन प्रिंटिंग व्यवसायात कार्यरत आहेत; तर आई प्रज्ञा बिरारी या घर सांभाळून शिकवणीवर्ग घेतात व शिवणकाम करतात.

अथर्वने इयत्ता बारावीचे शिक्षण बीवायके महाविद्यालयातून पूर्ण केले. यादरम्यानच २०२१ मध्ये त्याने सीए फाउंडेशन या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळविले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. तो २०२२ मध्ये सीए इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाला. यानंतर आवश्यक पात्रता पूर्ण करून नुकताच दिलेल्या सीए अंतिम परीक्षेतही त्याने पहिल्या प्रयत्नात यश मिळविले असून, यंदा त्याने राष्ट्रीय क्रमवारीत धडक घेतली. त्याच्या या प्रवासात सीए उल्हास बोरसे, सीए जयेश देसले, सीए दीपक वऱ्हाडे, सीएमए नवनाथ गांगुर्डे यांनी अथर्वला मार्गदर्शन केले.

अभ्यासाचे धोरण ठरले महत्त्वाचे

यशाचे गमक उकलून सांगताना अथर्व म्हणाला, की अभ्यासाला खूप आधीपासून सुरुवात केली होती. नियमितपणे वर्गात उपस्थितीबाबत सातत्य राखले. यामुळे परीक्षेपूर्वीच्या काळात उजळणीसाठी भरपूर वेळ मिळाला. या कालावधीत जास्तीत जास्त उजळणी करण्यावर तसेच चाचणी परीक्षा देण्यावर भर दिला.

Gold Price Increase India : सोने -चांदी दरावर युद्धाचा थेट परिणाम, दर वाढीचा फटका

यंदा पेपर खूप अवघड असतानाही अभ्यासासाठी प्रभावी धोरण आखल्याने यश मिळविता आल्याचे त्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या कालावधीत मित्र परिवाराची मोलाची मदत झाली. मोबाईलसह इतर गॅझेटचा वापर पूर्णपणे बंद केला नसला, तरी मर्यादित स्वरूपात संयमी वापर केल्याचे त्याने नमूद केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.