कामगार आयुक्त कार्यालयावर धडकणार कंत्राटी कामगार
esakal March 03, 2026 09:45 PM

कामगार आयुक्त कार्यालयावर धडकणार कंत्राटी कामगार
१६ एप्रिलला मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे तुटपुंज्या वेतनावर काम करीत असून, त्यांना रोजगाराची कोणतीही सुरक्षा नाही. त्यामुळे ते सातत्याने कंत्राटदारांच्या दबावाखाली असतात. त्यामुळे कंत्राटी कामगारांना कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी १६ एप्रिलला कंत्राटी कामगार वांद्रे पूर्व येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.
राज्यात कंत्राटी कामगार पद्धत कायम स्वरूपात बंद करीत कंत्राटदारविरहित वयाच्या ६० वर्षांपर्यंत रोजगारात सुरक्षेसाठी हरियाना पॅटर्नचा प्रस्ताव मंत्रिमंडळास समोर तातडीने आणण्यासाठी व अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी हा मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात कंत्राटी कामगारांसाठी निकराचा लढा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे यांनी स्पष्ट केले आहे. कंत्राटी कामगारांना नियमित करावे, या मागणीबरोबरच वीज उद्योगास स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी. किमान वेतन नव्हे; तर जीवन वेतन द्यावे. ईएसआयसी पात्रता मर्यादा २१ हजारांवरून ४२ हजार रुपये करावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.