ठाणे शहरात मटका-जुगार वाढला
esakal March 03, 2026 09:45 PM

ठाण्यात मटका-जुगाराचा विळखा घट्ट
गुन्हे १०० टक्के उघडकीस आल्याचा पोलिसांचा दावा; मात्र जप्त रक्कम घटली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मटका आणि जुगाराच्या अवैध व्यवसायांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे समोर आले आहे. २०२४च्या तुलनेत २०२५ मध्ये शहरात मटका-जुगाराच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी सर्व गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा केला असला, तरी जप्त करण्यात आलेल्या रकमेत झालेली मोठी घट लक्षवेधी ठरत आहे.
पोलिसांच्या आकडेवारीनुसार, ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाच परिमंडळांमध्ये २०२५ मध्ये मटका व जुगाराच्या गुन्ह्यांमध्ये ११६ने वाढ झाली आहे. अवैध जुगार अड्ड्यांवर सातत्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी २०२४च्या तुलनेत यंदा ६७३ अधिक आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, सततच्या धाडी आणि विशेष मोहिमांमुळे त्यांनी सर्वच्या सर्व गुन्हे उघडकीस आणले आहेत; मात्र गुन्हे आणि अटक संख्या वाढूनही जप्त केलेल्या एकूण रकमेतील घट हा चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, शहरात मटका व जुगारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके सक्रिय केली असून नागरिकांनी अशा अवैध प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात या गुन्ह्यांवर अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बोलताना स्पष्ट केले आहे.

जप्तीची रक्कम घटली
२०२५ मध्ये जप्त केलेली रक्कम सुमारे २२ लाख रुपयांनी कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. अवैध जुगार व्यवसाय लहान स्वरूपात किंवा विखुरलेल्या पद्धतीने सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच, ऑनलाइन माध्यमांचा वाढता वापर, मोबाईल अॅप्सद्वारे चालणारा सट्टा आणि वारंवार ठिकाण बदलणारे जुगार अड्डे यामुळे मोठी रोकड हाती लागणे कठीण होत आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढत असली तरी प्रत्यक्ष जप्ती कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.


मटका-जुगारवर कारवाई
सन गुन्हे उघड टक्के आरोपी जप्त माल
२०२४ ४५० ४५० १००% १,५२५ ५८,६८,८२०
२०२५ ५६६ ५६६ १००% २,१९८ ३६,७५,१५२

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.