बांदा नट वाचनालयामध्ये
‘माझ्या आठवणीतील कविता’
मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः मराठी मातृभाषेचा गौरव जपण्यासाठी थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त येथील नट वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत होते.
यावेळी सचिव राकेश केसरकर, सदस्य प्रकाश पाणदरे, अनंत भाटे, गुरुनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी कुसुमाग्रज यांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शनही मांडले होते. यानिमित्त ‘माझ्या आठवणीतील कविता’ या विशेष काव्यवाचन उपक्रमात अनंत भाटे यांनी ‘मेघदूत’ व ‘विशाखा’ या काव्यसंग्रहांबाबत विचार मांडले. गौरी सावंत, शुभ्रा तेली, स्नेहा सावंत, तेजस्विनी यादव, अर्चना सावंत, स्नेहा नाईक, लक्ष्मी सावंत, सुनीता नाईक, स्वाती सावंत, स्वप्नीता सावंत, सिद्धी प्रभुशिरोडकर यांनी विविध मराठी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. व्ही. एन. नाबर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे सादरीकरण केले. सदस्य प्रकाश पाणदरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अन्वर खान, लवू गावडे, उदय सावळ, नीलम सावंत उपस्थित होते. राकेश केसरकर यांनी आभार मानले.