बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ७४वे अधिवेशन उत्साहात संपन्न
Webdunia Marathi March 03, 2026 09:45 PM

देवास येथील 'मंडी व्यापारी धर्मशाला' येथे २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ७४वे त्रैमासिक अधिवेशन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याने देवासमध्ये 'लघु भारता'चे दर्शन घडवले. ठळक वैशिष्ट्ये:

मराठी भाषा गौरव दिन: अधिवेशनाचा प्रारंभ 'मराठी भाषा गौरव दिना'ने झाला. मुख्य अतिथी डॉ. अनुराधा सुपेकर यांनी मराठी भाषिकांच्या सुसंस्कृतपणाचे कौतुक करत, घरोघरी मातृभाषेतच बोलण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

सांस्कृतिक मेजवानी: 'शब्दस्वरांचा सुवर्ण प्रवास' आणि 'निर्मल निर्गुण' सारख्या कार्यक्रमांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. पं. भुवनेश कोमकली आणि कुमार राजयोग धुरी यांच्या गायनाने आध्यात्मिक वातावरण निर्मिती केली.

'मराठी गौरव शोभायात्रा' हे या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण ठरले.

वैचारिक आणि साहित्यिक सत्र: माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन (ताई) यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले. त्यांनी समाजसेवेसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांच्याशी झालेला 'मुक्त संवाद' विशेष गाजला. याप्रसंगी ऋचा कर्पे यांच्या 'शेवटी संवाद महत्त्वाचा' या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

कला दालन: डॉ. अरुण खेर यांची पिस्त्याच्या टरफलांवरील सूक्ष्म चित्रकला आणि संध्या सरवटे यांची चित्रे आकर्षणाचे केंद्र ठरली.

नूतन राष्ट्रीय कार्यकारिणी (निवडणूक निकाल):

अधिवेशनाच्या अंतिम दिवशी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली:

राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून श्री. दिलीप कुंभोजकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून श्री. दीपक कर्पे, प्रधान कार्यवाह म्हणून श्री. शेखर अमीन, कार्यवाह म्हणून श्री. प्रशांत बडवे, कोषाध्यक्ष म्हणून श्री. यशोवर्धन फाटक हे निवडण्यात आले.

देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी देवास महाराष्ट्र समाजाच्या उत्तम नियोजनाचे आणि आदरातिथ्याचे भरभरून कौतुक केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.