‘एक पोळी होळीच्या सामाजिक जाणिवेची’
गरजूंना पुरणपोळीचा गोडवा देणारा अनोखा उपक्रम
जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : होळीच्या सणानिमित्त समाजातील गरजू व बेघर बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी अलर्ट सिटीजन फोरम यांच्या वतीने ‘एक पोळी होळीच्या सामाजिक जाणिवेची’ हा उपक्रम यंदा सलग बाराव्या वर्षी राबविण्यात येत आहे. गेल्या ११ वर्षांपासून होळी पौर्णिमेच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक व पुणे या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सातत्याने पार पडत आहे.
होळीच्या दिवशी अग्नीत नैवेद्य म्हणून अर्पण होणाऱ्या पुरणपोळ्या विविध मंडळे, रहिवासी सोसायट्या व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून होळीच्या रात्री उशिरापर्यंत संकलित केल्या जातात. होळीच्या आदल्या रात्री विभागनिहाय स्वयंसेवकांच्या पथकाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेत पोळ्यांचे डबे तयार केले जातात. त्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी संबंधित भागांमध्ये जाऊन स्थानिक गरजू, होतकरू व बेघर नागरिकांना या डब्यांचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात येते. यावर्षी सुभाष नगरमधील बेघर कुटुंबांना हे डबे वाटण्यात आले व त्यांच्यासोबत रंगपंचमी साजरी करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी दिली. या उपक्रमातून धार्मिक एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश दिला जातो. सणांच्या दिवशी गरजूंना गोड अन्न देण्याची परंपरा जपत होळी अधिक अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. यंदाही या उपक्रमाला विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अधिकाधिक नागरिक, मंडळे व संस्था हे यात सहभागी झाली असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.