Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम
esakal March 04, 2026 05:45 PM

उरण : आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीवर झाला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) येथे सुमारे १,५०० ते दोन हजार कंटेनर अडकून पडले असून, कांदा, द्राक्षे आणि केळी यांसारख्या नाशवंत मालाच्या निर्यातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीवर होताना दिसत आहे.

जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीए) येथे सध्या सुमारे १,५०० ते दोन हजार ‘रिफर’ कंटेनर अडकून पडले असून, त्यामध्ये कांदा, द्राक्षे आणि केळी यांसारख्या नाशवंत कृषी मालाचा समावेश आहे. व्यापारी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांकडे जाणाऱ्या सागरी मार्गांवर असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक शिपिंग कंपन्यांनी माल स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Mumbai Crime: सिद्दिकी हत्येशी बिल्डर लॉबीचा संबंध नाही; मुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती, काय आहे प्रकरण?

अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे काही जहाजांची वेळापत्रके रद्द करण्यात आली आहेत, तर काही जहाजांना माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. जेएनपीए बंदरातून प्रामुख्याने इराक, सौदी अरेबिया, कतार आदी देशांमध्ये कृषी मालाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. विशेषतः महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहमदनगर, जळगाव परिसरातून द्राक्षे व केळी, तर कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात आखाती बाजारपेठेत होते.

व्यापाराला फटका

या परिस्थितीचा कृषी निर्यात क्षेत्रावर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. माल वेळेत पोहोचला नाही, तर गुणवत्ता घसरण्याची भीती आहे. वाढते रिफर कंटेनर भाडे, वीज खर्च आणि करार रद्द होण्याचा धोका यामुळे निर्यातदारांवर आर्थिक ताण वाढला आहे. परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास कृषी व्यापाराला दीर्घकालीन फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai ATS Raid : मुंबईत एटीएसच्या धाडी; महत्वाच्या तीन ठिकाणी धाड; इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया संघटनेचे कनेक्शन
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.