अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
युवराज जाधव March 04, 2026 07:13 PM

नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याऐवजी वाढत असल्याचं चित्र आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडून इराणमध्ये हल्ले करण्यात आले, त्याला इराणकडून अमेरिकन सैन्य तळांवर हल्ले करुन उत्तर देण्यात आलं. इराणकडून बहरीन, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरात आणि इराक येथील अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराणनं हल्ला केला. हा संघर्ष पाचव्या दिवशी देखील कायम आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार त्यांनी इराणचं मोठं नुकसान केलं आहे. मात्र, इराण  देखील लगेचच माघार घेण्याच्या स्थितीत नसल्याचं दिसतंय.

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा पाचवा दिवस सुरु आहे. क्षेपणास्त्रांचा मारा सुरु आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणच्या सैन्य तळावर मोठे हल्ले करण्यात आले आहेत. मात्र, इराणदेखील मागं हटण्यास तयार नाही. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या मृत्यूनंतर तेहरानमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, इराणच्या सैन्यानं अमेरिका आणि इस्त्रायलवर संघर्ष केला आहे. 

इराणकडून इस्त्रायलमध्ये हल्ले केले जात आहेत. त्याचवेळी बहरीन, कुवैत, कतार आणि युएई या देशांमधील अमेरिकन सैन्य तळांवर हल्ले केले आहेत.इराणनं इस्त्रायलवर 70 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. इराणचे विदेश मंत्री अब्बास अरागची यांच्या मते ते शांतता आणि युद्ध दोन्हीसाठी तयार आहेत.

किती दिवस युद्ध चालणार?

सैन्य विश्लेषकांमध्ये यात दोन मतप्रवाह आहेत. अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध 7 ते 10 दिवस चालू शकतं. अमेरिकेच्या युद्धाची क्षमता पाहता काही जाणकारांच्या इराण 10 दिवस इराण सामना करु शकते. कारण इराणला शस्त्रसाठा मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. 

2025 मध्ये इराणनं युद्ध 12 दिवसांपर्यंत सुरु ठेवलं होतं. त्याचं उदाहरण देत काही विश्लेषकांनी इराणनं जर होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली तर जागतिक तेल संकट निर्माण होईल आणि युद्ध काही महिने लांबू शकतं, असं म्हटलं आहे. 

2025 मधील संघर्षामुळं इराणचा शस्त्रसाठा प्रभावित झाला होता. इराणकडे 3000 बॅलेस्टिक मिसाईल आहेत. इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेनुसार यापूर्वीचा संघर्ष आणि सध्या सुरु असलेल्या युद्धात इराणचे 200 लाँचर्स नष्ट झाले आहेत. इराणकडे अजून 1000 ते 1500 क्षेपणास्त्र असू शकतात, असा अंदाज आहे. 

इराणची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांनी डोंगरांच्या खाली बनवलेली भूमिगत क्षेपणास्त्र शहरं ही आहे. हे बंकर जमिनीत 500 मीटर खाली आहेत. जिथं हजारो आत्मघाती  ड्रोन आणि मिसाईल आहेत. ते नष्ट करणं अमेरिकेसमोर मोठं आव्हान आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.