सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
Marathi March 04, 2026 08:25 PM

मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हं असल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. आखाती देशांमधील वाढत्या संघर्षामुळं क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाल्यानं महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळं फेड रिझर्व्ह आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्याज दरात कपात होण्याची शक्यता कमी असल्यानं  याचा परिणाम बाजारावर झाला.

सेन्सेक्स 1123 अंकांनी घसरुन 79116.19 अंकांवर आला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 385 अंकांनी घसरुन 24480.50 वर बंद झाला.  तर, बीएसई 150 मिडकॅप निर्देशांक 2.26 टक्क्यांनी आणि बीएसई 250 स्मॉलकॅप निर्देशांक 2.24 टक्क्यांनी कमी झाला.

गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान

सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 457 लाख कोटींनी कमी होऊन 447 लाख कोटी झाले. म्हणजेच आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तर, चार दिवसात सेन्सेक्स 3160 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये चार दिवसात 1016 अंकांची घसरण झाली.  इंडिया VIX निर्देशांक 23 टक्क्यांवर पोहोचला आहे.

शेअर बाजारातील घसरणीची कारणं

अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याची चिन्ह नसल्यानं  शेअर बाजारावर त्याचे परिणाम दिसून आला.  डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्धचा संघर्ष चार ते पाच आठवडे चालू शकतो असं म्हटलं. युद्ध सुरु असल्यानं क्रूड ऑईलचे दर वाढत आहेत. यामुळं बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार भारताचा रुपया 68 पैशांनी घसरुन 92.15 रुपये डॉलर वर पोहोचला आहे. रुपया कमजोर झाल्यानं भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले आहेत.

ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 82 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष सुरु झाल्यानंतर 75 डॉलर प्रति बॅरलवरुन दर 82 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते 1 डॉलरनं जरी क्रूड ऑईलचे दर वाढले तर भारताला 16000 कोटी रुपये अधिक मोजावे लागू शकतात.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारातील गुंतवणूक काढून घेतली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय बाजारात त्यांनी 6641 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.  तर, 2 मार्चला त्यांनी 3295.64  कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.