दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे तर… स्वामी गोविंददेवगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
Tv9 Marathi March 04, 2026 05:45 PM

Dnyaneshwari Eknathi Bhagwat Tukaram Gatha and Dasbodh: समता, बंधुतेची पताका खांदी घेऊन वारकरी समाजाने महाराष्ट्र धर्माची वीण घट्ट विणली. पण गेल्या काही दशकात वारकऱ्यांवरच आणि वारकरी परंपरेवरच अनेक आघात होत असल्याचे दिसते. वारकरी परंपरेतील कच्चे दुवे शोधून त्यातून वाद घडवून आणले जात असल्याची ओरड होत आहे. त्यातच आता गोविंददेवगिरी महाराजांनी पुण्यात एक विधान केलं आणि वारकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. वारकरी परंपरेवरील त्यांचे हे भाष्य वादग्रस्त ठरले आहे. काय म्हणाले स्वामी गोविंददेवगिरी महाराज?

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचं वादग्रस्त वक्तव्य

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी बीजभाषण केले. या बीजभाषणादरम्यान स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी संतपरंपरेविषयी एक मांडणी केली. त्यांच्या मते, संतपरंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन असल्यामुळे त्या स्वतंत्र ग्रंथ मानता येत नाहीत, असे भाष्य केले. त्यांना निरुपण करताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत होता हे समोर आले नसले तरी त्यांच्या या वक्तव्याने वाद मात्र झडला आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

संत परंपरेत संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत तुकाराम यांचा मोठा अधिकार मानल्या जातो. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस’ अशी संत परंपरा शिकवते. अशावेळी थेट संतपरंपरेच्या गाभ्यावरच अशी टीका केल्याने वारकरी संतापले आहेत. वारकरी संघटनांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तर संत परंपरेच्या फडातही या चिंतनावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रामदासी आणि वारकरी पंथात उभा भेद असला, भक्ती मार्ग वेगळा असला तरी ईश्वर प्राप्ती हेच अंतिम उद्दिष्ट मानले जाते. पण गोविंददेव गिरी यांच्या या वक्तव्याने राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

ते RSS चे प्रोडक्ट

गोविंद गिरी महाराज हे आरएसएस प्रॉडक्ट आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची ‘गाथा’ बहुजनांसाठी होती, हे भटळलेल्या स्वामी गोविंद गिरी महाराजांना समजणार नाही अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी स्वामी गोविंदगिरी महाराजांवर केली आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.