बिबट्याच्या हल्ल्यात
सैतवडे येथे वासरू जखमी
बंदोबस्त करण्याचे वनविभागाला साकडे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे परिसरातील शेतकऱ्यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. या ठिकाणी वारंवार मागणी करूनही वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आलेला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सैतवडे आणि आसपासच्या वाड्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांना लक्ष्य करत आहे. काल (ता. ३) रात्री बलभीमवाडी येथील प्रदीप पवार यांच्या गोठ्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केला. वासराच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे घरच्यांनी धाव घेतली तेव्हा बिबट्या तेथून पसार झाला; मात्र, या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले असून, पवार यांचे नुकसान झाले आहे. ही या भागातील तिसरी घटना आहे. यापूर्वीही दोनवेळा बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. प्रत्येक घटनेनंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले, पंचनामे झाले; परंतु ठोस उपाययोजना मात्र शून्य आहेत. बिबट्या आता फक्त जनावरांवर नाही तर माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमची मुले-बाळे भितीपोटी घराबाहेर पडायला घाबरत आहेत, अशा भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.