मुणगेत विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे
esakal March 04, 2026 09:45 PM

28540

मुणगेत विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे

भगवती प्रशालेत ‘गावठी बाजार’; खरेदीसाठी ग्रामस्थांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ४ ः येथील श्री भगवती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भरविलेल्या गावठी बाजाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, कोकणी मेवा, काजू, कोकमे, खाद्य पदार्थ यांच्या दुकानांची मांडणी लक्षवेधी ठरली. यामुळे गावठी बाजाराला खऱ्याखुऱ्या बाजाराचे स्वरुप आले होते.
गेल्या काही वर्षांपासून भगवती हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या घराकडून तयार केलेली मुळाभाजी, पाले भाजी अशा विविध प्रकारचा भाजीपाला तसेच गावठी तांदूळ, कुळीथ, काजू, शेगलाच्या शेंगा, फणस आदी वस्तू आणून शाळेच्या आवारात गावठी बाजार भरविला जातो. या उपक्रमाचे उद्घाटन श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेश बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष नीलेश परुळेकर, सदस्य संतोष लब्दे, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, पोलिसपाटील साक्षी सावंत, चंद्रकांत रासम, दशरथ मुणगेकर, संजय परुळेकर, अनिरुद्ध कारेकर, मोतिराम उर्फ दादा वळंजू, शिवदास रासम, विलास आईर, सोमनाथ रुपे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गावठी बाजार व खाद्यपदार्थ स्टॉल हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, उद्योजकतेची ओळख, आर्थिक व्यवहारांचे महत्त्व आणि स्वावलंबनाची जाणीव करून देणे हा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन करून विविध गावठी वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि पारंपरिक पदार्थांचे स्टॉल उभारले. प्रत्येक स्टॉलची मांडणी आकर्षक व सुबक केली होती. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत विक्री-खरेदीची प्रक्रिया अनुभवली. नफा-तोटा मोजणे, किंमत ठरवणे, वस्तूंची मांडणी, ग्राहक सेवा यांसारख्या अनेक व्यावहारिक गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला. मुणगेतील प्राथमिक शाळा व सर्व शिक्षक सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका कुंज, सहाय्यक शिक्षक प्रसाद बागवे, श्री. महाले, गौरी तवटे, रश्मी कुमठेकर, सेजल बागडे, सुविधा बोरकर यांनी मार्गदर्शन केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.