Accident News : आजचा बुधवार हा अपघातवार ठरला आहे. राज्याच्या काही भागात आज भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. आज परभणी जिल्ह्यासह लातूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
परभणीच्या पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाजवळील अत्यंत अरुंद आणि धोकादायक पुलावरुन पिकअप गाडी नदीपात्रात कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका 31 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अंकुश रामेश्वर शिंदे (रा. शिंदे टाकळी, ता. सेनगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अरुंद पुलामुळे अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. नवीन पूल उभा करण्यात आला आहे मात्र त्याच्या जोडरस्त्यांसाठी निधी मिळत नसल्याने त्याचे काम रखडले आहे.येलदरी येथील अरुंद पुलावरून जात असताना पुलाला कठडे नसल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन थेट पूर्णा नदीच्या पात्रात कोसळले.
सध्या धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदीला मोठा प्रवाह आहे. गाडी पाण्यात पडल्यानंतर पुलाला अडकली, मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने अंकुश यांना बाहेर पडता आले नाही. मागील वर्षी येलदरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे या जुन्या पुलाचे कठडे वाहून गेले होते. तेव्हापासून हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने येथे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. आज येलदरीचा आठवडी बाजार असल्याने पुलावर मोठी गर्दी असते. पुलाच्या मध्यभागी ही घटना घडल्याने आणि बचाव कार्य सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या शर्थीने मृतदेह बाहेर काढला.
लातूर जिल्ह्यातील जळकोट शहरात 3 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता महात्मा फुले चौकातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव स्विफ्ट कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उदगीर येथे हलविण्यात आले आहे. कार चालक किरकोळ जखमी झाला. धर्माबादहून हरभरा घेऊन येणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. नांदेडहून डोनगावकडे अंत्यविधीसाठी जाणारी कार ट्रकवर आदळल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.कार चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे ट्रक चालक अक्रम शेख यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.
कणकवली तालुक्यातील खारेपाटण मधील पुरुषोत्तम शेट्ये यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऋतुपर्ण शेट्ये आणि तनिषा शेट्ये यांचा भीषण अपघात होऊन तनिषा शेट्ये जागीच ठार झाली असून तिचा भाऊ ऋतुपर्ण शेट्ये हा गंभीर जखमी झाला आहे. वडिलांना तळेरे येथून घेऊन येण्यासाठी त्यांचा मुलगा ऋतुपर्ण शेट्ये आणि मुलगी तनिषा शेट्ये दोघेही जुन्या मॉडेलची ॲम्बेसिडर कार घेऊन तरळेच्या दिशेने निघाले होते. नडगीवे येथील धुरीभाटालेवाडी बस थांब्याजवळ येताच गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला भरधाव वेगाने येऊन मागून धडक दिली.
यात तनिषा ही जागीच ठार झाली.