Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी
esakal March 05, 2026 02:45 AM

कामठी - रंगपंचमीच्या आनंदोत्सवाला काळिमा फासणारी आणि माणुसकीला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना कोराडी परिसरात उघडकीस आली आहे.

अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या एका आजीने स्वतःच्याच चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची अमानुष घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास वॉर्ड क्रमांक २, आरामशिन परिसरात घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला घराबाहेर पिचकारीने रंग खेळत होता. त्याचवेळी त्याच्या आजीने होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत भरून नेत होत्या. खेळकरपणे चिमूकल्याने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. मात्र या क्षुल्लक कारणावरून संताप अनावर झालेल्या आजीने हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट चिमूकल्याच्या अंगावर ओतली.

उकळते पाणी अंगावर पडताच चिमूकला वेदनेने आरडाओरडा करू लागला. कमरेखालचा भाग गंभीररीत्या भाजल्याने त्याला तातडीने थंड पाणी टाकण्यात आले; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. त्याचे वडील वेकोलीत कार्यरत असून मुलावर सध्या नागपूरच्या नेल्सन या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुलगा सुमारे ४५ टक्के भाजल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे चिमूकला हा त्या आजीच्या मुलीचा मुलगा असून तो आई-वडिलांसह आजीकडेच राहत होता. सणासुदीच्या दिवशी एका निरागस बालकावर अशी क्रूर शिक्षा देण्याच्या प्रकाराने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. 'नात्यालाच काळिमा फासणारी घटना' अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून संबंधित आजीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. निरागस बालकाच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या या अमानुष कृत्याने समाजमन सुन्न झाले असून सणांच्या उत्सवात संयम आणि संवेदनशीलतेची गरज अधोरेखित झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.