लाखांदूर (जि. भंडारा) - किराणा दुकानातील २५ हजार रुपयांच्या चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, बदनामी सहन न झाल्याने एका १७ वर्षीय मुलीने विष प्राशन करून संपविले जीवन. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिचोली/अंतरगाव येथे शंभू निमजे (वय ७०) यांचे किराणा दुकान आहे. २७ फेब्रुवारी रोजी शंभू निमजे आपल्या घरच्या कामात व्यस्त असताना दुकानातील प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले २५ हजार रुपये चोरीला गेले होते. यादरम्यान एका अल्पवयीन मुलीला संशयास्पदरित्या दुकानाबाहेर पडताना एका स्थानिक महिलेने पाहिले होते.
चोरी केल्यानंतर ती मुलगी त्याच दिवशी कोराडी (नागपूर) येथे आपल्या नातेवाइकांकडे गेली होती. तिने चोरलेली रक्कम त्या नातेवाइकाकडे सोपवून ती २८ फेब्रुवारीला गावी परतली. दरम्यान, दुकानदार निमजे यांनी लाखांदूर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती.
मुलगी गावी परतताच संशयावरून पोलिसांनी तिला आणि तिच्या वडिलांना १ मार्च रोजी पोलिस ठाण्यात पाचारण केले. चौकशीदरम्यान मुलीने चोरी केल्याची कबुली दिली आणि पैसे कोराडी (नागपूर) येथील नातेवाइकाकडे असल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ नातेवाईकाशी संपर्क साधून चोरीची रक्कम हस्तगत केली.
मुलगी ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिला योग्य समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान, पोलीस ठाण्यातून घरी परतल्यानंतर आपण पकडले गेलो आहोत आणि आता समाजात आपली बदनामी होईल, या विचाराने मुलगी प्रचंड तणावात होती. याच भीतीपोटी ती १ मार्च रोजी घरात असलेले विषारी औषध प्याली.
प्रकृती खालावल्याने तिला तातडीने लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे मंगळवारी (ता. ३) उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने चिचोली गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास लाखांदूर पोलिस करीत आहेत.