फोटो ओळी : AKK26B05930
अक्कलकोट : येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरातील गाभारा ग्रहणानंतर पाण्याने धुऊन स्वच्छ करताना पुरोहित.
स्वामी समर्थ मंदिर चंद्रग्रहणामुळे दोन तास बंद
स्वच्छता करुन मंदिर रात्री दर्शनासाठी खुले
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. ४ : फाल्गुन शुक्ल पौर्णिमेनिमित्त मंगळवारी (ता. ३) लागलेल्या खग्रास (ग्रस्तोदीत) चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान सायंकाळी ६ ते ८ या वेळेत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. ग्रहणकाळात मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार या कालावधीत दर्शन व धार्मिक विधी स्थगित करण्यात आले होते.
चंद्रग्रहणाचा स्पर्श सायंकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी झाला, तर मोक्ष ६ वाजून ४८ मिनिटांनी झाला. सुमारे १८ मिनिटांच्या मुख्य पर्वकाळात मंदिर बंद ठेवण्यात आले. ग्रहणाचे वेध सूर्योदयापासून लागल्यामुळे सकाळचे अभिषेक, तसेच साडेअकराची नैवेद्य आरती यांसारखे नित्योपचार झाले नाहीत. परंतु, ग्रहण पर्वकाळात दिवसभर ते सायंकाळी ६ पर्यंत स्वामी दर्शन चालू ठेवण्यात आले होते.
ग्रहणमोक्षानंतर मंदिराची स्वच्छता करून रात्री ८ वाजता मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात आले. दरम्यान, ग्रहणकाळामुळे रात्रीची शेजारती नियमित वेळेत होऊ शकली नाही. बुधवारी (ता. ४) पहाटेपासून काकडा आरती व नित्य अभिषेकासह सर्व धार्मिक कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.