पिंपरी, ता. ४ : समस्या जाणून घेण्यासह नागरिकांशी अधिक प्रभावी, पारदर्शक व सकारात्मक संवाद प्रस्थापित करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस विशेष उपक्रम सुरु करणार आहेत. ‘पोलिस आयुक्तांची भेट’ असे या उपक्रमाचे नाव आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांना पोलिस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भेट घेऊन आपल्या समस्या, सूचना, तक्रारी व अपेक्षा मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारे पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नसेल. नागरिक उपक्रमाच्या दिवशी निश्चित करून दिलेल्या वेळेत पोलिस आयुक्तांना भेटू शकतील. हा उपक्रम प्रत्येक सोमवारी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित केला जाणार आहे.
नागरिक केंद्रित पोलिसिंगच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करणे, तक्रार निवारण प्रक्रियेला गती दाणे व प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ करणे हा या मागील उद्देश आहे. या उपक्रमासाठी पोलिस आयुक्त, पोलिस सह आयुक्त, सर्व पोलिस अपर पोलिस आयुक्त, सर्व पोलिस उपायुक्त उपस्थित असतील. तरी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
----------------------------------------------------------------------------------------