पारगाव - शिरदाळे, ता. आंबेगाव येथे गेली दोनशे ते अडीचशे वर्षांपासून धुलीवंदन हा सण अनोख्या पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. परंपरेनुसार होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी काल मंगळवारी धुलीवंदनाला पारंपारिक पध्दतीने लहान मुलांना महाभारत, रामायण व पौराणिक पध्दतीची वेशभुषा करुन विरांचा पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागात आजही सण, उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात त्यातच होळी आणि धुळवड हे दोन सण ग्रामीण संस्कृतीमध्ये भर टाकणारे सण आहेत. हे दोनही सण शिरदाळे गावात अतिशय आनंदाने आणि ग्रामीण परंपरा जपत साजरे केले जातात. धुलिवंदन हा सण दोनशे ते अडीचशे वर्षांपासून परंपरा जपत साजरा करण्यात आला.
गावातील लहान तर काही जेष्ठ मंडळींनी वीर देवाची वेशभूषा करून मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला होता. गावातून प्रदक्षिणा घालून गावच्या चौकामध्ये महिलांनी पाण्याने गोलाकार केलेले वर्तुळ आणि त्या वर्तुळावर वीर देवांचे धावणे ही शेकडो वर्षांची परंपरा आजही मोठ्या भक्तिभावाने जपली जात आहे.
विविध रंगाच्या कापडांची आकर्षक वेशभुषा केलेल्या मुलांच्या हातात, पायात आणि गळ्यात चाफ्याच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात एक काठी आणि एका हातात देव असलेली वाटी तर अंगाला गंध आणि गळ्यात एखादा अलंकार, डोक्यावर फेटा असा वेष वीर देवाला चढवला जातो.ही सजावट करून प्रत्येकाच्या वाड्याचे वीर देव एकत्र गावच्या चौकात येतात.
त्यानंतर त्यांची मिरवणूक गावाबाहेरील महादेव मंदिराला प्रदक्षिणा घालते त्या ठिकाणी तळी भंडार करून मिरवणूक गावच्या चौकात येते.मग सुरू होतो जुन्या मंडळींची "घाई". घाई म्हणजे वाजंत्री मंडळींच्या तालावर दोनही बाजूने सारख्या प्रमाणात उभे राहून केला जाणारा पारंपरिक लेझीम नृत्य म्हणजेच घाई. ही घाई तोंडाने बजावलेल्या शेट्टीच्या तालावर बदलली जाते.
गावातील अनेक जेष्ठ आणि तरुण देहभान विसरून जुने जाणते मंडळी नाचण्याचा आनंद घेत असतात. यावेळी अनेक जेष्ठ मंडळींनी ताशाच्या आणि सनईच्या तालावर घाई धरून जुन्या पद्धतीने घाई धरली. यात कोंडीभाऊ तांबे, गेनभाऊ रणपिसे, शंकर तांबे, संभाजी सरडे, प्रभाकर तांबे, रामचंद्र रणपिसे, बाळू चौधरी, मच्छिंद्र चौधरी यांनी यात सहभाग घेतला.
अतिशय सुंदर सोहळा हा संपन्न झाला. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ ,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
तर काही तरुण मंडळी एकमेकांना रंग लावत धुळवड देखील खेळतात. या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येऊन हा सण अतिशय आनंदाने गेली कित्येक वर्षे साजरा करत असल्याचे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगीतले.